बिजली वाघीण कधी गर्भवती नव्हतीच!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

मुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘गोड’ बातमी असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर झाले आणि वनाधिकारी नवीन पाहुण्याच्या स्वागताच्या तयारीला लागले. उद्यानातील बिजली वाघीण गर्भवती राहिल्याने तीन महिन्यांत तिचा बछडा जन्माला येणार म्हणून सारेच सुखावले. बिजलीच्या प्रत्येक हालचालीवर वनाधिकारी आणि कर्मचारी लक्ष ठेवून होते. मात्र, तीन महिन्यांचा प्रसूतीकाळ संपल्यावरही बछडा जन्माला येत नसल्याने सारेच चक्रावले. तब्बल महिनाभर प्रसूती लांबल्यानंतर बिजली गर्भवती नसल्याचा साक्षात्कार वनाधिकाऱ्यांना झाला आणि त्यांना तोंडघशी पडावे लागले.

मुंबई - बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘गोड’ बातमी असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर झाले आणि वनाधिकारी नवीन पाहुण्याच्या स्वागताच्या तयारीला लागले. उद्यानातील बिजली वाघीण गर्भवती राहिल्याने तीन महिन्यांत तिचा बछडा जन्माला येणार म्हणून सारेच सुखावले. बिजलीच्या प्रत्येक हालचालीवर वनाधिकारी आणि कर्मचारी लक्ष ठेवून होते. मात्र, तीन महिन्यांचा प्रसूतीकाळ संपल्यावरही बछडा जन्माला येत नसल्याने सारेच चक्रावले. तब्बल महिनाभर प्रसूती लांबल्यानंतर बिजली गर्भवती नसल्याचा साक्षात्कार वनाधिकाऱ्यांना झाला आणि त्यांना तोंडघशी पडावे लागले. सर्वांनाच आता बिजलीच्या वाढलेल्या पोटाची चिंता लागली आहे.

बिजली वाघीण आणि यश वाघ यांच्या जोडीचे एप्रिलच्या अखेरच्या दिवसांत मिलन झाले होते. तीन महिन्यांचा प्रसूतीकाळ संपल्यावर बिजली प्रसूत होईल, अशी सर्वांनाच आशा होती. दररोज वनाधिकारी बिजलीच्या वाढलेल्या पोटाकडे लक्ष ठेवून होते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बिजलीची प्रसूती होईल, अशी घोषणाही उद्यानाचे संचालक व मुख्य वनसंरक्षक अन्वर अहमद यांनी केली. परंतु, ऑगस्ट संपला तरी बिजलीने बछड्याला जन्म न दिल्याने सर्वच जण बुचकळ्यात पडले. बिजलीची सोनोग्राफी करायची म्हटली तरी तिच्या रागीट स्वभावामुळे तिला हातही लावता येईना. प्रसूतीच्या अखेरच्या टप्प्यात तिची सोनोग्राफी करणे अजूनच कठीण झाले. सोनोग्राफीदरम्यान तिच्या पोटावर थोडा जरी दाब पडला असता तरी गर्भ दगावण्याचा धोका असतो, असे स्पष्टीकरण उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी केले. या सगळ्या गोंधळात बिजली खरोखरच गर्भवती आहे का, याचीही चर्चा रंगली. अखेर ऑगस्टच्या अखेरपर्यंतही बिजली प्रसूत न झाल्याने ती गर्भवती नसल्याच्या निष्कर्षापर्यंत वनाधिकारी आले. बिजली गर्भवती नव्हती; मग तिचे पोट वाढले कसे, याची तपासणी त्यांना आता करावी लागणार आहे. 

प्राणिमित्र संघटनांचा संताप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांच्या रखवालदारांचा ढिसाळ कारभारच या सगळ्या गोंधळाला कारणीभूत असल्याचा आरोप प्राणिमित्र संघटनांनी केला आहे. प्राण्यांसाठी २४ तास रखवालदार नसणे, प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याबाबत रखवालदारांवर वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे नियंत्रण नसणे आदी ढिसाळ कारभारामुळे बिजली प्रकरणात उद्यानाचे हसे झाल्याचा आरोप प्राणिमित्र संघटनांनी केला.