सातवीच्या विज्ञानाच्या काठिण्य पातळीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

मुंबई - जून उजाडायला एक आठवडा शिल्लक असल्याने पालकांना आता मुलांच्या शाळांचे वेध लागले आहेत; परंतु, बदललेल्या अभ्यासक्रमात सातवीच्या विज्ञान विषयाची काठिण्य पातळी पाहून पालकांसह शिक्षकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

मुंबई - जून उजाडायला एक आठवडा शिल्लक असल्याने पालकांना आता मुलांच्या शाळांचे वेध लागले आहेत; परंतु, बदललेल्या अभ्यासक्रमात सातवीच्या विज्ञान विषयाची काठिण्य पातळी पाहून पालकांसह शिक्षकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

गेल्या वर्षी सहावीची पाठ्यपुस्तके बदलल्यानंतर यंदा सातवी व नववीची पाठ्यपुस्तके बदलण्याचा निर्णय मराठी पाठ्यपुस्तक मंडळाने जानेवारीत घेतला. शाळा सुरू होण्यापूर्वी पालक मुलांच्या बदलत्या अभ्यासक्रमाबाबत माहिती घेण्यासाठी दुकानात हेलपाटे घालत आहेत. अजूनही नववीचे इतिहासाचे पुस्तक वगळता बाजारात अन्य कोणतेही पुस्तक आलेले नाही. दहावीचा पाया म्हणून नववीला महत्त्व असताना नववीची पुरेशी पुस्तके मिळत नसल्याने पालक चिंतेत आहेत.

सातवीची पुस्तके संकेतस्थळावर आहेत; परंतु या सगळ्या पुस्तकांत विज्ञान विषयाची काठिण्य पातळी जास्त असल्याची चर्चा शिक्षकांत सुरू आहे. विज्ञान विषयातील संज्ञा सातवी इयत्तेतील मुलांना लगेच समजणार नाहीत. त्यामुळे मुलांना घोकंपट्टी करण्याची सवय लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे. सातवीच्या तारकांविषयीच्या शेवटच्या धड्यातील काठिण्य पातळी खूपच उंची गाठत असल्याचेही शिक्षकांचे मत आहे.

काही शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, राज्य बोर्डाने इतर बोर्डांच्या तुलनेत आता अभ्यासक्रमाची उंची वाढवण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे अभ्यासक्रम काठिण्य पातळीवर आला आहे. सातवीसाठी भौतिकशास्त्र शिकवण्यास पुरेसे शिक्षक मिळणे कठीण असल्याने या विषयाची पूर्वतयारी उन्हाळ्यात होणे जास्त आवश्‍यक ठरते.

नववीची पुस्तके 15 जूनपूर्वी बाजारात मिळू लागतील. सातवीची जवळपास सगळी पुस्तके बाजारात आली आहेत.
- सुनील मगर, संचालक, बालभारती