स्वतंत्र लढण्यास भाजपही तयार- शेलार

स्वतंत्र लढण्यास भाजपही तयार- शेलार

मुंबई - ‘‘भाजप-शिवसेना युती असावी अशीच आमची भूमिका होती; पण शिवसेना स्वबळाची भाषा करत असेल, तर २०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजप तयार आहे. यात नुकसान झाले तर ते शिवसेनेचेच होईल,’’ असे मत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी व्यक्त केले.

शिवसेनेने २०१९ च्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय आज जाहीर केला. त्यावर प्रतिक्रिया देताना शेलार म्हणाले, ‘‘२०१९ ची लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक स्वतंत्र लढायला भाजप तयार आहे. राज्यातील जनताही या निवडणुकांसाठी तयार आहे.’’ यामुळे नुकसान झाले तर ते तुमचेच असेल, असा इशारा त्यांनी या वेळी शिवसेनेला दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणताही अभ्यास न करता ‘एकला चलो’चा निर्णय घेतला आहे. त्यांच्या खासदार व आमदारांशी जरी ते बोलले तरी हे समजेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे २०१४ च्या निवडणुकीत कधी नव्हे ते शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. आता एकटे लढल्यावर त्यांचे केवळ ४ ते ५ खासदारच निवडून येतील. मोदी यांच्या लाटेत २०१४ च्या निवडणुकीत त्यांचे १८ खासदार आले. याची जाणीव शिवसेनेला आहे. त्याचा विसर त्यांना पडू नये.
- संजय काकडे, खासदार

भाजप आता आपल्याला युतीसाठी बरोबर घेणार नाही, याचे आत्मभान झाल्यानेच शिवसेनेने आज ही रणनिती आखली आहे. एकटेच जायचे आहे तर आतापासूनच तयारी केलेली बरी म्हणूनच ही रणनिती आहे. हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने पातळ केला होता, हा मुद्दा पुन्हा त्यांनी प्रखर करण्यास सुरवात केली आहे. गुजरातमध्ये केवळ भाजप आणि काँग्रेस असे दोनच पारंपारिक पक्ष अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रात चार पक्ष आहेत. त्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्राची तुलना होऊ शकत नाही. 
- प्रकाश पवार, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ

जे दिसत होते, ते आता अधिकृत होणार आहे. म्हणजेच, हिंदुत्वावर विश्‍वास ठेवणाऱ्या दोन राजकीय विचारांमध्ये संघर्ष उद्‌भवणार आहे. हा संघर्ष २०१९ च्या निवडणुकीच्या आधीपासूनच सुरू होत असून तो परस्परांना संपवल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना आपोआपच राजकीय बळ मिळाले आहे. पाच वर्षे सत्ता टिकवणे भाजप व शिवसेना या दोघांनाही जमत नाही, हे इतिहासाने सिद्ध केले आहे. आता भविष्यकाळातही हे सिद्ध होईल.
- जयदेव डोळे, ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक

स्वबळावर लढण्याच्या निर्णयामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा काहीसा फायदा होईल. मात्र बहुतमाचा प्रश्‍न कायम राहील. महाराष्ट्रातील राजकारण ‘ओबीसी’ केंद्रभूत असून, शिवसेनेकडे त्यासंबंधीची जमेची बाजू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपुढे प्रभावी नेतृत्वाचा प्रश्‍न तयार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. दलित चळवळीचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे स्वबळावर निवडणुका लढवून सत्तेसाठी एकत्र येण्याचा फंडा नवा नसेल.
- प्रा. प्रशांत देशपांडे, नाशिक

स्वतंत्र लढण्याच्या शिवसेनेने घेतलेल्या निर्णयामुळे शहरी मतांची विभागणी होण्याची शक्‍यता अधिक आहे. ग्रामीण भागात याचा तुलनेने कमी फटका बसेल. मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे शिवसेनेची ताकद आहे. या दोन्हीही पक्षांची ताकद शहरी भागात आहेत. त्यामुळे येथील मते विभागली जातील. भाजप-शिवसेना युती झाल्यानंतरही जागावाटपावरून वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्‍यता जास्त आहे. त्यामुळे स्वतंत्र लढण्याचा शिवसेनेने घेतलेला निर्णय हा पक्षाच्या हिताचा राहील.
प्रा. डॉ. नितीन बिरमल, राज्यशास्त्राचे अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com