मुंबईच्या प्रश्‍नांवर शिवसेना आक्रमक!

विष्णू सोनवणे
सोमवार, 11 डिसेंबर 2017

मुंबई - कधीही कोसळतील अशा धोकादायक स्थितीत मुंबई शहरात ३९९ इमारती आहेत. एसआरएची १८०० प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. मेट्रोमुळे जमिनीखालील पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण वाहिन्या, तसेच इतर सुविधा खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यांचे मेट्रोच्या कामामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भविष्यात आरोग्याचे गंभीर प्रश्‍न निर्माण होणार आहेत. मुंबईशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्‍नांचा दारूगोळा शिवसेनेकडे असून, अधिवेशनात शिवसेना मुंबईच्या प्रश्‍नांवर आक्रमक होणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. 

धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. इमारतींचा पुनर्विकास, समूह विकास करण्याचे घोंगडे भिजत पडले आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या आणि श्रेणी सी १ मध्ये असलेल्या ३९९ इमारती अतिधोकादायक स्थितीत आहेत. त्या खासगी, पालिका, म्हाडा तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारितील आहेत. मुंबईत घाटकोपरमध्ये २० ऑगस्टला सिद्धीसाई इमारत कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला. २०१३ मध्ये डॉकयार्ड रोड येथील पालिकेची बाबू गेनू मंडईची इमारत कोसळून ६१ जण दगावले. इमारतींच्या संरचनेत बदल केले जात आहेत. इमारतींचे पिलर बेदरकारपणे कापले जात आहेत. पालिकेची यंत्रणा सक्षम असूनही या प्रत्येक दुर्घटनेने यंत्रणेची बेफिकीरी समोर आली आहे. 

मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे. विकास हवा; मात्र तो मुंबईकरांच्या जीवावर उठणारा नको, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने मेट्रोबाबत घेतली आहे. पर्यावरणावर मेट्रोच्या कामाचा मोठा परिणाम होत असून, पूर्व आणि पश्‍चिम उपनगरातील चेंबर जाम झाले आहेत. त्याबाबतच्या उपाययोजनांचा पालिका आणि मेट्रोकडे कोणताही प्लॅन नाही. त्यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांबाबत शिवसेना हिवाळी अधिवेशनात आक्रमक होणार असल्याची माहिती शिवसेनेचे विधिमंडळ मुख्य प्रतोद आणि आमदार सुनील प्रभू  यांनी दिली.

एसआरएच्या निपटाऱ्यासाठी आग्रह
एसआरएची सुमारे १८०० प्रकरणे पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहेत. या प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होत नाही. त्यामुळे रखडलेली प्रकरणे मार्गी लावण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. या प्रश्‍नांवर चर्चा घडविण्याची मागणी विधिमंडळातील शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली आहे. त्यामुळे एसआरएच्या विषयावर अधिवेशनात वादळी चर्चा होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: mumbai news shiv sena winter session