शिवसेनेची महागाईविरोधी मोर्चात घोषणाबाजी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

जे मोंदीच्या नावाने निवडून आले. सत्तेच्या खुर्चीवर बसले तेच आज मोदींच्या विरोधात घोषणा देतात. "खालल्या ताटात घाण करणारे' अशांनाच म्हणतात. कुणाच्या पायऱ्या चाटत राजकरणात जिवंत राहण्याची धडपड करायला मी अनिल परब नाही. मी कमळ चिन्हावर निवडून आलो आहे. पाठिंबा काढल्यानंतर कुणाची औकत किती, हे कळेलच.
- ऍड्‌. आशीष शेलार, अध्यक्ष, मुंबई भाजप

मुंबई: "एवढी माणसे कशाला? मोदींच्या मयताला', "नरेंद्र सरकार हाय हाय', "चले जाव, चले जाव, भाजप सरकार चले जाव' अशा घोषणा देत शनिवारी (ता. 23) शिवसेनेने आपल्याच सरकारवर आसूड ओढले. मुंबईतील 12 ठिकाणी शिवसेनेने हे मोर्चे काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील घोषणांमुळे भाजपही खवळली आहे. त्यामुळे भाजप - शिवसेनेत शाब्दीक युद्ध रंगले आहेत. एकमेकांची "लायकी' काढण्यापर्यंत अनेकांची मजल गेली आहे. या सर्व प्रकारानंतरही शिवसेना सत्तेला चिटकून राहिल्यास मोठा फटका बसण्याची शक्‍यता लक्षात घेऊन "युती'चा घटस्फोट जवळ आल्याचे मानले जात आहे.

इंधनासह जीवनावश्‍यक वस्तूंचे दर वाढल्याच्या निषेधार्थ शिवसेना शनिवारी रस्त्यावर उतरली. मुंबईत विविध ठिकाणी मोर्चे काढून महागाईची प्रेतयात्रा काढण्यात आली. "एवढी माणसे कशाला? मोदींच्या मयताला' अशा घोषणा देत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात भाजपला आव्हान दिले. शिवसेनेचे मुखपत्र "सामना'तून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थेट पंतप्रधानांच्या धोरणांवर टीका करत होते. महापालिकेतही शिवसेनेच्या नगरसेवकांनी "मोदी चोर है'च्या घोषणा दिल्या होत्या. मात्र, शनिवारी रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांनी मोदींविरोधी घोषणाबाजी केल्याने शिवसेना - भाजपमधील वाद पुन्हा चिघळला आहे. त्यामुळे यापुढेही शिवसेना सत्तेला चिटकून राहिल्यास विश्‍वासार्हता कमी होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. हे शिवसेनेलाही माहित असल्याने सत्तेतून बाहेर पडण्यापूर्वी भाजपला "दणके' देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे मानले जात आहे.

मातोश्री माझ्यासाठी मंदिर आहे. त्याच्या पायऱ्या धुवायची चाटायची माझी तयारी आहे. महापालिकेत एका मताने का होईना आम्ही जिंकलो. आम्ही कधीच खालल्या ताटात घाण केली नाही. शेलार मातोश्रीच्या पायऱ्या चाटत मोठे झाले. बाळासाहेबांच्या भेटीसाठी ते तासन्‌तास मातोश्रीबाहेर वाट पाहत बसायचे हे त्यांनी विसरू नये.
-ऍड्‌. अनिल परब, आमदार, शिवसेना