कांडला बंदरात होणार सौर-पवनऊर्जा प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

मुंबई - कांडला बंदरातील जमिनीवर दोनशे मेगावॉट क्षमतेचा सौर आणि पवनऊर्जा प्रकल्प उभारण्याची शक्‍यता पडताळून पाहिली जात आहे. त्यासाठी जलवाहतूक मंत्रालयाने समिती स्थापन केली आहे, अशी माहिती केंद्रीय जलवाहतूक व भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

मुंबईतील "हरित बंदर आणि तेल गळती व्यवस्थापन 2017' या परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, 'सौर आणि पवनऊर्जा प्रकल्पात गुंतवणूक करणे कमी खर्चिक असून, आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. यातून निर्माण होणारी वीज नॅशनल ग्रीडद्वारे वापरता येईल. सौरऊर्जेचा प्रत्येक युनिटमागील खर्च कमी होऊन दोन रुपये 63 पैसे झाला आहे. याद्वारे सर्व बंदरे दरवर्षी सातशे कोटींपर्यंत बचत करू शकतील. सागरमाला प्रकल्पात एकूण 12 लाख कोटींची गुंतवणूक करून 14 औद्योगिक क्‍लस्टर उभारण्यात येतील आणि त्यामुळे हरितऊर्जेच्या वापरालाही प्रोत्साहन मिळेल.''

इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी, जलवाहतूक मंत्रालयाचा सागरमाला प्रकल्प, मुंबई पोर्ट ट्रस्ट, इंडियन पोर्टस असोसिएशन आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी ही परिषद आयोजित केली.