हाजी अली सबवेवर फेरीवाल्यांचे बस्तान

street hawker
street hawker

मुंबादेवी: मुंबईतील प्रमुख धार्मिक स्थळे मानले जाणारे महालक्ष्मी मंदिर व हाजी अली दर्गा यांमध्ये सर्वधर्मीय भाविकांची अलोट गर्दी असते. या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जायचे असेल तर, रस्त्याच्या खालून जाणाऱ्या सबवेचा वापर करावा लागतो, पण सबवेमध्ये सुद्धा अनेक फेरीवाले ठाण मांडून बसले आहेत.  प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवार, शनिवार तसेच रविवार यादिवशी जवळपास 5 हजारावर भाविक महालक्ष्मी मंदिर व हाजी अली दर्गा येथे दर्शनासाठी याच सबवेमधून ये जा करत असतात.  दोन्ही बाजूला फेरीवाले बसून धंदा करत असल्याकारणाने तेथून चालणे अतिशय कठीण झाले आहे.  

हाजी अली सबवे फेरीवाल्याचे बस्तान
हाजी अली जाण्यासाठी हजारो प्रवासी या सबवेचा वापर करतात.  कारण रस्ता मोठा असल्याकारणाने रस्ता ओलांडताना जीव जाण्याची शक्यता असल्यामुळे सबवेचा वापर करा ह्या सूचना पालिका प्रशासनाकडून दिल्या जातात.  पण 'कृपया सबवे वापरा' असे लिहिलेल्या सबवेत पहिले पाऊल टाकले नाही तोच घड्याळ, लेडीज बॅग, कपडे यांचे स्टॉल आहेत.

येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी हे फेरीवाले मोठमोठ्याने ओरडून बोलवत असतात.  त्यामुळे पादचाऱ्यांना या समस्येचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, त्यातही सबवेमधून बाहेर आल्यावर समोसे, वडापाव, सरबत यांच्याही गाड्या लागलेल्या असतात.पायऱ्यांवर बसलेले भिकारी भीक मागत अंगावर येतात, तर स्वच्छता अशी की प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते.  जर सबवेंची अवस्था इतकी भयानक असू शकते, तर यातून जाण्यापेक्षा काही क्षणांसाठी जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडलेला बरा नाही का? महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने या पुढे सबवेमध्ये फेरीवाले बसू नये याची काळजी घ्यावी असे मत बहुसंख्य पादचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. 

सबवेची दैनंदिन देखभाल, त्यांची झाडलोट, सुरक्षाची जबाबदारी त्या त्या परिसरातील वॉर्डची असते. हाजी अली हा परिसर डी वॉर्ड मध्ये येतो. सबवेमध्ये वेळच्या वेळी स्वच्छता होते की नाही, त्यातील दिवे, पंखे यासर्वांची जबाबदारी वॉर्ड पातळीवरच होणे अपेक्षित असते. परंतु, ती होताना दिसत नसल्याच्या तक्रारी येत असतात असे ते मान्य करतात, पण त्यावर तोडगा काढला जात नाही.  मुळात सबवेचे बांधकाम करतानाच त्याच्या सर्व भागांची जबाबदारी निश्चित होणे गरजेचे असते, परंतु प्रत्येक विभाग एकमेंकाकडे बोट दाखवत असल्याने शेवटी त्रास सहन करावा लागतो तो रोज प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यालाच.  प्रशासनाला घटना घडल्यावरच जाग येते का? असा प्रश्न इकडे उपस्थित होत आहे.

सुदीप नाईक (सामाजिक कार्यकर्ते)  - नागरिकांची सुरक्षा ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. महापालिकेने ह्या विषयाकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. पालिकेने तातडीने ह्यात लक्ष घालून सर्वतोपरी प्रयत्न करून नागरिकांना दिलासा मिळवून द्यावा.

जी साउथचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सकपाळ यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com