विद्यार्थ्यांनी गिरवले चांगल्या स्पर्शाचे धडे! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

बेलापूर - चांगला आणि वाईट स्पर्श म्हणजे काय? तो कसा ओळखायचा? याचे धडे नवी मुंबईतील शिरवणे व रबाळे येथील पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी सोमवारी गिरवले. ‘सकाळ माध्यम समूहा’ने सुरू केलेल्या ‘जागर संवेदनेचा’ उपक्रमात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी विद्यार्थ्यांना लैंगिक शोषणापासून स्वतःला कसे वाचवता येईल याचा कानमंत्र दिला. महापालिकेच्या शिरवणे शाळा क्रमांक १५ व रबाळे येथील छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील या कार्यक्रमांना पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. 

विद्यार्थ्यांवरील लैंगिक शोषणाच्या घटना वाढीस लागल्या आहेत. बालवयातच अशा वाईट कृत्यांची माहिती नसल्याने त्यांच्या अज्ञानाचा फायदा समाजातील वाईट प्रवृत्ती घेतात; मात्र त्याचे दूरगामी परिणाम यात बळी पडलेल्या विद्यार्थ्यांवर होत असतात. काहींना आयुष्यभरासाठी मानसिक धक्का बसतो. हे धोके लक्षात घेऊन ‘सकाळ’ने विद्यार्थ्यांसाठी लैंगिक प्रबोधनाची मोहीम नवी मुंबईत सुरू केली आहे. सोमवारी महापौर जयवंत सुतार यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात झाली आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी विद्यार्थ्यांशी अतिशय साध्या वा सोप्या भाषेत संवाद साधून लैंगिक शोषणाबद्दल आणि त्यातून वाचण्याविषयीची माहिती दिली.