पार्किंगच्या जागांबाबतच्या तक्रारींवर कार्यवाही करा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

न्यायालयाचे महापालिका, वाहतूक पोलिसांना निर्देश
मुंबई - मुंबई शहर-उपनगरांतील पार्किंगच्या जागांवरील गैरसोईंबाबतच्या तक्रारींवर कार्यवाही करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलिसांना दिले.

उड्डाण पुलांखालील जागेत सुरक्षेच्या कारणास्तव वाहने उभी करण्यास मनाई करण्यासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर व नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. पार्किंगशी संबंधित सर्व ठिकाणांवर पुरेशा सुविधा व नियमांचे पालन करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

उड्डाण पुलांखाली गाड्या उभ्या करण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली. खंडपीठाने याबाबत समाधान व्यक्त केले.

सरसकट पार्किंगच्या सर्वच जागांवर गैरप्रकार होत असल्याचा दावाही न्यायालयाने अमान्य केला. त्याऐवजी अशा प्रकारे गैरप्रकार किंवा नियमांचे उल्लंघन करून पार्किंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत पालिका आणि वाहतूक पोलिसांकडे तक्रार करावी. संबंधित यंत्रणांनीही तक्रारीची दखल घेऊन योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी दखल न घेतल्यास न्यायालय त्याची दखल घेईल, असे स्पष्ट करत न्यायालयाने याचिका निकाली काढली.