मुंबई - वाऱ्याची दिशा बदलताच मुंबईतल्या थंडीने काढता पाय घेतला. कमाल तापमानाने मंगळवारी पस्तीशी (35.6) गाठली.
जानेवारी महिन्यात गेल्या दहा वर्षांत तिसऱ्यांदा मुंबईचे कमाल तापमान 35 अंशावर गेल्याची नोंद आहे. थंडीचा कडाका जानेवारी महिन्याच्या सुरवातीला अनुभवल्यानंतर पंधरवड्यात तापमान वाढ होईल, असा पूर्वानुमान मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने अगोदरच वर्तवला होता. या दिवसांत उत्तरेकडून थंडीचे वारे वाहून आणणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलेल, त्यामुळे तापमानात वाढ होईल, असे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने सांगितले होते. दुसऱ्या आठवड्याच्या सुरवातीला कमाल तापमान 33 अंशावर होते. गेल्या काही दिवसांपासून कमाल पारा सतत 33 अंश सेल्सिअसवर होता. त्यात आर्द्रताही वाढली होती. अचानक थंडीला लागलेल्या ब्रेकमुळे पुन्हा स्वेटर कपाटात ठेवावे लागले. परंतु, मंगळवारी घामाचा आणि उकाड्याचा एरव्हीपेक्षाही अधिक अनुभव आला.
पृष्ठभागावरून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव सध्या किनारपट्टीभागांवर दिसून येत आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ झाल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिली. उद्या (बुधवारी) कमाल पारा पुन्हा 33 अंश सेल्सिअसवर येईल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
याआधीच्या जानेवारीतील 35 अंशावर आलेला कमाल पारा
17 जानेवारी 2008 - 35.8 अंश सेल्सिअस
31 जानेवारी 2010 - 35.2 अश सेल्सिअस
|