तीन महापालिकांतील सत्तेचा आज फैसला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

मुंबई - पनवेल, भिवंडीसह मालेगाव महापालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, याचा फैसला उद्या (ता. 26) होईल. तिन्ही महापालिकेसाठी उद्या मतमोजणी होईल. दुपारपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले. मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणी दरम्यान किंवा निकालानंतर कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेसाठी सर्वच पक्षांनी ताकद लावल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. येथील 78 जागांसाठी 418, भिवंडी महापालिकेच्या 90 जागांसाठी 560 तर मालेगाव महापालिकेसाठी 83 जागांसाठी 273 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मतदारांनी सत्तेसाठी कुणाला कौल दिला आहे, याचीच साऱ्यांना उत्सुकता आहे.