नगरसेवकांनी टोलमाफी मागताच "मातोश्री' संतापली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

मुंबई - राज्यभरात मुंबईतील नगरसेवकांना टोल माफ करण्याच्या ठरावावरून विरोधकांनी शिवसेनेला लक्ष्य केल्यानंतर आता "मातोश्री'ही चांगलीच संतापली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना फैलावर घेतल्यामुळे हा ठराव मागे घेण्याची नामुष्की ओढवणार आहे.

शिवसेनेचे तुकाराम पाटील यांनी ठरावाची सूचना मांडली होती. ती पालिकेच्या महासभेत मंजूर करून ठराव प्रशासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. हा प्रकार प्रसिद्धिमाध्यमांनी उघड केल्यानंतर भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी या ठरावाला विरोध करण्यास सुरवात केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्यासह पालिकेतील सर्वच नेत्यांना फैलावर घेतल्याचे समजते. पुन्हा असे फुकटचे काही मागू नका, अशी तंबीच ठाकरे यांनी दिल्याचे कळते. त्यामुळे हा ठराव मागे घेण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढवणार आहे. ठराव मागे घेण्याची पहिलीच वेळ शिवसेनेवर येणार आहे.

ठरावाची सूचना मांडण्यापूर्वी पक्षाच्या गटनेत्याला दाखवण्याची प्रथा आहे. गटनेत्याने मंजुरी दिल्यानंतरच ती मांडली जाते. त्यामुळे यापुढे एकाही ठरावाची सूचना सभागृहनेते यशवंत जाधव यांना दाखवल्याखेरीज मांडू नका, अशी तंबीही नगरसेवकांना देण्यात आली आहे. शिवसेनेने यंदा महापालिकेत नव्या चेहऱ्यांना नेतृत्वाची संधी दिली. हे चेहरे कामकाजात फारसा प्रभाव दाखवू शकलेले नाहीत. त्यातच अशी मागणी करून पक्षाला अडचणीत आणल्यामुळे पक्षप्रमुख ठाकरे नाराज असल्याचे समजते.