वाहतूक पोलिसांनी बुजवले खड्डे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

कल्याण - पावसाळ्यापूर्वी पालिका परिसरात झालेल्या कामाची मागील काही दिवसांत पडलेल्या पावसाने पोलखोल केली आहे. पावसात डांबरीकरण करू शकत नाही, म्हणून खड्ड्यांत खडी टाकली जातात; मात्र ती खडी वाहून जात असल्याने शहरात जागोजागी खड्डे पडले आहेत. परिणामी, वाहतूक कोंडी होते. ती दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनीच कंबर कसली असून, ते स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे बुजवत आहेत.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले असून, जागोजागी वाहतूक कोंडीने नागरिक आणि वाहनचालक बेजार झाले आहेत. याबाबत वाहतूक पोलिसांनी पालिकेला पत्र लिहून खड्डेमय रस्त्याची व्यथा मांडली होती. पावसाने उघडीप दिल्यावर पालिकेने अनेक भागांत खासगी ठेकेदारामार्फत खड्ड्यात खडी टाकण्याचे काम सुरू केले; मात्र पुन्हा आलेल्या पावसात खडी वाहून गेल्याने कल्याण पूर्व-पश्‍चिममधील प्रमुख रस्ते खड्ड्यांत गेले आहेत. याची दखल घेऊन वाहतूक पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत परिसरातील खड्डे खडी, दगडांनी बुजवले. यामुळे काही काळ परिसर कोंडीमुक्त झाला. 

पावसाने उघडीप दिल्याने कल्याण पूर्व-पश्‍चिम भागांत खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी आणि नंतर रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजवण्यासाठी १२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पावसामुळे खड्डे पडले आहेत. पाऊस थांबला की, डांबरीकरण करू.
- रघुवीर शेळके, कार्यकारी अभियंता, पालिका 

शहरात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. याबाबत पालिकेला कळविले आहे. पालिका खड्डे बुजवते; मात्र खड्ड्यांत टाकलेली खडी पावसाने वाहून जाते. वालधुनी परिसरात कोंडी जास्त असल्याने पोलिसांनी पुढाकार घेत खड्डे बुजवले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्याला पर्याय नाही. 
- संभाजी जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, कल्याण