अमली पदार्थ तस्करीप्रकरणी दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

मुंबई - सुमारे 21 किलो काश्‍मिरी चरस घेऊन आलेल्या एका काश्‍मिरी नागरिकासह टॅक्‍सीचालकाला अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) रविवारी (ता. 9) रात्री नागपाडा परिसरातून अटक केली. त्याची किंमत 83 लाख आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला 39 किलो चरससह अटक करण्यात आली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर आरोपीने पुन्हा चरस विकण्यास सुरवात केली. दरम्यान, यातून कमावलेल्या पैशांतून दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत देण्यात येत होती का, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

हाजी अब्दुल रेहमान अली मोहम्मद शेख (वय 67, अनंतनाग, काश्‍मीर सध्या रा. नागपाडा) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे 15 किलो 660 ग्रॅम चरस, आधार कार्ड व पाच हजारांची रक्कम सापडली. त्याच्यासह टॅक्‍सीचालक इरफान मैसार कुरेशी (वय 42) यालाही एएनसीने अटक केली. त्याच्याकडून पाच किलो 260 ग्रॅम चरस, चालक परवाना व टॅक्‍सीच्या चाव्या जप्त करण्यात आल्या आहेत.

शेखला यापूर्वीही 39 किलो चरससह एएनसीने अटक केली होती. याप्रकरणी त्याला 10 वर्षांची शिक्षाही झाली आहे. तो सध्या जामिनावर बाहेर होता.