तळोजा कारागृहात दोन कैद्यांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

नवी मुंबई - भायखळा कारागृहातील मंजुळा शेट्ये हत्याप्रकरण ताजे असताना, तळोजा मध्यवर्ती कारागृहातच दोन कैद्यांवर सात जणांच्या टोळीने हल्ला केला. या मारहाणीत दोन कैदी गंभीर जखमी झाले; मात्र त्यांच्यावर कारागृहातच किरकोळ उपचार करण्यात आले. याप्रकरणी खारघर पोलिस ठाण्यात कैद्यांच्या नातेवाइकांनी तक्रार केली असून, पोलिस तक्रारीला प्रतिसाद देत नसल्याचा आरोप केला जात आहे. पनवेल तालुक्‍यातील दुंदरे गावात जमिनीच्या वादातून काही दिवसांपूर्वी दोन गटांत हाणामारी झाली होती. याप्रकरणी संतोष व दिलीप सिनारे या दोन भावांना तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीसाठी पाठविण्यात आले. काल सकाळी संतोष व दिलीप यांना भेटण्यासाठी त्यांची बहीण नेहा कडू व तिचे पती निंबाराज, भाऊ हनुमान व परशुराम सिनारे गेले होते. त्या वेळी तुरुंगातील सिनारे बधूंनी आपल्यावर 9 जुलै रोजीच्या रात्री सागर शिलेदार व विकी देशमुख यांच्याबरोबर अन्य पाच जणांच्या टोळक्‍याने बरॅकमध्ये घुसून जबर मारहाण केल्याची घटना सांगितली.