इंद्राणीच्या तक्रारीवर अदखलपात्र गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

मुंबई - भायखळा तुरुंगात इंद्राणी मुखर्जीला झालेल्या कथित मारहाणप्रकरणी नागपाडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इंद्राणीने नुकतीच याबाबत तक्रार नोंदवली होती. आपल्याला मारहाण झाल्याचे इंद्राणीने न्यायालयातही सांगितले होते. त्यावर वैद्यकीय चाचणी करून पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्याची सूचना न्यायालयाने इंद्राणीला केली होती. इंद्राणीच्या वैद्यकीय चाचणीत तिच्या उजव्या हाताला व पायाला मुका मार लागल्याचे निष्पन्न झाले होते.

दरम्यान, भायखळा तुरुंगातील कैदी मंजुळा शेट्ये हिला मारहाण झाल्याचे; तसेच तिच्यावर अनन्वित अत्याचार झाल्याचे तिच्या शवविच्छेदन अहवालात नमूद असल्याचे सूत्रांनी सांगितले.