गावांतील डॉक्‍टरांच्या हजेरीसाठी संकेतस्थळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

मुंबई  - ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेचे पद स्वीकारल्यानंतर वारंवार गैरहजर राहणाऱ्या डॉक्‍टरांवर वचक ठेवण्यासाठी लवकरच संकेतस्थळ सुरू केले जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमइआर) आणि आरोग्य संचालनालयाच्या समन्वयातून त्याची निर्मिती केली जाणार आहे. यात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचीही (एमयूएचएस) महत्त्वाची भूमिका असेल.

दांडीबहाद्दर डॉक्‍टरांसंदर्भात सरकारने कठोर पावले उचलायला सुरवात केली आहे. संकेतस्थळाद्वारे गैरहजर डॉक्‍टरांवर लक्ष ठेवण्याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच आहे, अशी माहिती "डीएमइआर'च्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. हे संकेतस्थळ तीन महिन्यांत तयार होईल. एमकेसीए कंपनीला त्यासाठी कंत्राट दिले आहे; मात्र हे काम मोफत होत असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

या संकेतस्थळाबाबत आरोग्य संचालनालयाचे अधिकारी डॉ. सतीश पवार यांनी दुजोरा दिला. पुढील शैक्षणिक वर्षात हे संकेतस्थळ कार्यान्वित होईल. ग्रामीण भागात नियुक्ती झाल्यानंतर याच संकेतस्थळावर डॉक्‍टरांना त्यांची हजेरी दिसेल. संकेतस्थळात लिंक दिली जाईल. "डीएमईआर'ने उत्तीर्ण विद्यार्थ्यांची माहिती अपलोड केल्यानंतर आरोग्य संचालनालयाकडून ग्रामीण भागातील डॉक्‍टरांसाठी रिक्त पदांबाबत माहिती दिली जाईल. यात "एमयूएचएस'तर्फेही माहिती दिली जाणार आहे. त्यातून ग्रामीण भागात पद स्वीकारणाऱ्या डॉक्‍टरांची हजेरी अद्ययावत केली जाईल. गैरहजर राहणाऱ्यांसंदर्भात याद्वारे माहिती मिळेल, असे डॉ. सतीश पवार यांनी सांगितले.