पतीच्या दयामरणासाठी पत्नी न्यायालयात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

मुंबई - वटसावित्रीच्या दिवशी डॉक्‍टर पतीने केलेल्या दयामरणाच्या मागणीसाठी पत्नी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका करण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने आर्थिक मदत करण्याबाबत नकारघंटा लावल्यामुळे आता उपचाराच्या खर्चाची वानवा दोघांनाही सतावत आहे.

मुंबई - वटसावित्रीच्या दिवशी डॉक्‍टर पतीने केलेल्या दयामरणाच्या मागणीसाठी पत्नी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका करण्याच्या तयारीत आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने आर्थिक मदत करण्याबाबत नकारघंटा लावल्यामुळे आता उपचाराच्या खर्चाची वानवा दोघांनाही सतावत आहे.

डॉ. भारत लोटे हे पंचवीसहून अधिक वर्षे सरकारी नोकरीत होते. सध्या ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी आहेत. कोकण विभागांमधील गावांमध्ये त्यांनी सरकारी डॉक्‍टर म्हणून काम केले आहे; परंतु आता जेव्हा ते दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत, तेव्हा सरकारने कुटुंबीयांना दुर्लक्षित केल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे. पुण्यातील एका रुग्णालयामध्ये मागील काही महिन्यांपासून ते उपचार घेत असून, आतापर्यंत तीस लाख रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. या उपचारासाठी त्यांनी घर, दागिने तर गहाण ठेवलेच आहेत; पण कर्जही काढले आहे. सरकारी कर्मचारी म्हणून त्यांना उपचारासाठी मदत करावी, अशी मागणी त्यांची पत्नी संगीता यांनी वेळोवेळी आरोग्यमंत्र्यांकडे आणि विभागामध्ये केली आहे; मात्र अद्याप याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही.

'माझ्या पतीने माझ्याकडून वटसावित्रीच्या दिवशी वचन घेतले, की मी दयामरणासाठी याचिका करेन. त्यांच्या उपचारासाठी होणारी दगदग आणि सरकार यामुळे ते हताश झाले आहेत; पण त्यांची तब्येत ठीक व्हावी, यासाठी मी प्रयत्न करतेय. आता माझेही हात तोकडे होत आहेत, त्यामुळे दयामरणाच्या याचिकेसाठी वकिलांबरोबर बोलणी सुरू केली आहेत, असे संगीता यांनी "सकाळ'ला सांगितले. लोटे यांचा सध्याच्या अवस्थेचा एक व्हिडिओही त्यांनी व्हायरल केला आहे.

दयामरणाला कायदेशीर मंजुरी नाही, त्यामुळे उच्च न्यायालयात जर ही याचिका दाखल झाली तर त्यावर महत्त्वपूर्ण निकाल अपेक्षित आहे.