प्लास्टिक बंदीसाठी मुंबई सज्ज 

प्लास्टिक बंदीसाठी मुंबई सज्ज 

दादर - राज्यभरात प्लास्टिकबंदी लागू झाली असली तरी तिची अंमलबजावणी संथगतीने सुरू आहे. मुंबईच्या बाजारात आजही प्लास्टिक पिशव्या नजरेस पडत आहेत. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी म्हणून महापालिका प्रभाग स्तरावर विशेष तपासणी पथके नियुक्त करणार आहे. सोमवार (ता. 2)पासून प्लास्टिक पिशव्यांप्रकरणी कारवाई होणार असल्याने मिठाई, वडापाव, मासळी, भाजी विक्रेते आणि दुकानदारांनी कागदी पिशव्यांचे पर्याय वापरण्यास सुरुवात केली आहे. काही विक्रेते तर चक्क ग्राहकांना घरून कापडी पिशव्या आणण्यास सांगत आहेत. दुसरीकडे पर्यायी व्यवस्था आणि योग्य नियोजन नसल्याने काही व्यापाऱ्यांनी बंदीचे स्वागत करत नाराजीही व्यक्त केली. 

गुढीपाडव्यापासून प्लास्टिक बंदी लागू झाली. त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली आहे; मात्र विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात त्याबाबतची अधिसूचना निघाली. त्यानंतर दोन दिवस सुट्या असल्याने पालिकेने पूर्वतयारीसाठी वेळ घेऊन सोमवारपासून प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्याचे ठरविले आहे. 

ग्राहकांना सर्रास प्लास्टिक पिशव्यांतून सामान देणाऱ्या विक्रेत्यांनी आता हळूहळू का होईना; पण स्वतःला बदलायला सुरुवात केल्याचे चित्र आज रविवारी दिसून आले. अगदी मटण-मासळीपासून भाजी-वडापाव आदींसाठी पर्याय शोधण्याचा विक्रेत्यांचा प्रयत्न सुरू होता. अनेक मिठाईवाल्यांनीही बासुंदी-गुलाबजाम आदींसाठी घरून डबे आणण्यास ग्राहकांना सांगितले. पर्यायच नसल्याने ग्राहकही पुन्हा घरी जाऊन डबे आणत होते. 

पालिका प्रशासनाच्या प्लास्टिक पिशव्या बंदीचे काही प्रमाणात नागरिकांनी स्वागत केले आहे. अनेक ठिकाणी मात्र व्यापाऱ्यांमध्ये निर्णयाबाबत नाराजीचा सूर उमटताना दिसला. काही ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्लास्टिक होलसेलर्स यांना नुकसान सहन करावे लागत आहे. महापालिकेच्या वतीने प्लास्टिकविरोधी दंडात्मक कारवाई होत असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे. दंड भरायला लागू नये म्हणून काही दुकानदारांनी प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देणे बंद केले आहे. काहींनी निर्णयाचे स्वागत करत स्वतःहून पिशव्या देणे बंद केले असल्याचे चित्र मुंबईच्या बाजारात पाहायला मिळत आहे. अगदी पाच रुपयांपासून कापडी पिशव्या बाजारपेठेत विकत मिळत आहेत. वरळी विभागात भाजी विक्रेत्यांकडे कापडी पिशव्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. वरळीतील भाजी विक्रेते ग्राहकांना आवर्जून घरातून स्वतः पिशव्या घेऊन या, अशा सूचना देत होते. वडापाव वा खाद्यपदार्थ विक्रेते कागदाचा वापर करताना दिसत होते. 

किती मायक्रॉनचा पर्याय? 
महत्त्वाचे म्हणजे किती मायक्रॉनपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत, त्याबाबत कोणतीही जनजागृती न करता सरकारने प्लास्टिकविरोधी धोरण लागू केले आहे. त्यामध्ये व्यापारी आणि नागरिक दंडास पात्र असणार आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गातून सरकारच्या आणि पालिकेविरोधात नाराजीचे सूर उमटत आहेत. वरळी, प्रभादेवी, माहीम, दादर आदी परिसरात भाजी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देणे बंद केले आहे. 

सरकारची बंदी योग्यच 
वरळी-माहीममध्ये अनेक ठिकाणी मासळी विक्रेत्या महिलांनी प्लास्टिक पिशव्या देणे बंद केल्याचे चित्र रविवारी होते. माशांसाठी घरातून कापडी पिशव्या वा डबे आणण्याच्या सूचना विक्रेते ग्राहकांना करीत होते. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणून सरकारने उत्तम निर्णय घेतला आहे. नागरिकांना काही दिवसांत तो सोईचा वाटू लागेल. घरातून निघतानाच सोबत कापडी पिशवी घेतली तर त्याला निर्णयाचा निश्‍चितच त्रास होणार नाही, अशी प्रतिक्रिया वरळीतील मासळी विक्रेत्या रूपाली तांडेल यांनी दिली. 

आम्ही दुकानात ग्राहकांसाठी पाच रुपयांपासून कापडी पिशव्या विकायला ठेवल्या आहेत. बंदीमुळे प्लास्टिकचे प्रदूषण नक्कीच कमी होईल. सध्या आम्ही छोट्या-मोठ्या वस्तूंसाठी पर्याय म्हणून कागद आणि कागदी पिशव्यांचा वापर करत आहोत, असे प्रभादेवीतील गणेश जनरल स्टोअर्सच्या मालकांनी सांगितले. 

प्लास्टिक पिशव्या बंदीच्या निर्णयाचे स्वागत; परंतु सरकारने पर्यायी वस्तू उपलब्ध करून देणे गरजेचे होते. आज हॉटेलमध्ये आम्ही डोसा कागदात रॅप करू शकतो; पण सांभार आणि चटणी कशात बांधणार? सरकारने पर्याय उपलब्ध केला असता तर काही पैसे अधिक देऊन आम्ही तो आनंदाने स्वीकारला असता. सरकारने नवीन पर्याय ठेवणे गरजेचे होते. प्लास्टिक बंदीचा प्रयोग यशस्वी करायचा असल्यास पर्याय उपलब्ध करणे गरजेचे आहे, असे प्रभादेवीतील हॉटेल आदर्शचे मालक म्हणाले. 

माझा खूप जुना फरसाण बनवण्याचा कारखाना आणि होलसेल विक्रीचे दुकान आहे. प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीचा माझ्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. दररोज चार ते पाच हजार रुपये नुकसान होत आहे. फरसाण बनवणाऱ्या कामगारांना बसून पगार द्यावा लागत आहे. प्लास्टिक बंद करण्याआधी सहा महिने सरकारने पर्याय उपलब्ध केला असता तर आमचे नुकसान टळले असते. कोणतेही ठोस धोरण न बनवता तातडीने निर्णय घेऊन बंदी लागू करणे व सर्वांना वेठीस धरणे योग्य नाही. 
- कृष्णा नाडर, फरसाण व्यापारी, धारावी 

प्रत्येकाने घरातूनच कागदी पिशवी घेऊन निघावे. मी कागडी पिशवी बरोबरच ठेवते. सुरुवातीला दोन दिवस ते त्रासदायक वाटले; परंतु हळूहळू सवय होत आहे. महापालिकेचा निर्णय स्वागतार्ह आहे. 
- बिंद्रा पांडे, महिला 

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर प्रत्येकाने वैयक्तिकरीत्या बंधन घातले तर सरकारचा निर्णय माझ्याप्रमाणे प्रत्येकाला स्वागतार्ह वाटेल. कोणतीही चांगली बाब अंगवळणी पडायला वेळ लागतो. त्याचप्रमाणे प्लास्टिक पिशव्या बंदीचा निर्णय यशस्वी होण्यासाठी थोडा वेळ नक्की जाईल; पण प्लास्टिक पिशव्यांमुळे होणारे प्रदूषण आणि परिसरातील अस्वच्छता कमी व्हायला नक्की मदत होईल. 
- सुशांत भोसले, सामान्य नागरिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com