पोलिस आयुक्तालयाची सुरक्षा वाऱ्यावर 

पोलिस आयुक्तालयाची सुरक्षा वाऱ्यावर 

नवी मुंबई - बेलापूर येथील नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेले झेरॉक्‍स स्कॅनिंग मशीन वर्षभरापासून बंद आहे. आयुक्तालयात येणाऱ्या नागरिकांची व त्यांच्यासोबत असलेल्या सामानाची तपासणी करण्यासाठी व सुरक्षेच्या हेतूने २०१०-११ मध्ये स्कॅनिंग मशीन बसवण्यात आले; मात्र वर्षभरापासून ते बंद असल्याने फक्त मेटल डिटेक्‍टरच्या भरवंशावर पोलिस आयुक्तालयाची सुरक्षा अवलंबून आहे. 

२०१०-११ मध्ये पोलिस महासंचालक कार्यालयातून नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या सुरक्षेसाठी ‘गोदरेज ॲण्ड बॉईज’ कंपनीकडून सीआरएस फंडातून ॲस्ट्रोफिजिक्‍स कंपनीच्या तीन झेरॉक्‍स स्कॅनिंग मशीन पाठवल्या होत्या. यातील एक बेलापूर येथील पोलिस आयुक्तालयात बसवण्यात आली. दुसरी कळंबोलीतील पोलिस मुख्यालयात आणि तिसरी मोटार ट्रान्सपोर्ट विभागात बसवली आहे; परंतु काही वर्षांनी पोलिस आयुक्तालयातील स्कॅनिंग मशीनचे पार्ट खराब झाल्याने ते नादुरुस्त झाले होते. मशीनमधील संगणकात बिघाड झाला असून बेल्टही खराब झाले होते. मशीनमध्ये सामानाचे स्कॅनिंग केल्यानंतर संगणकात आलेल्या छायाचित्रांमध्ये काळे डॉट्‌स दिसत असल्याची तक्रार करण्यात आली होती. मशीनची दुरुस्ती करण्यासाठी २०१६ मध्ये सुमारे चार लाख ५० हजार खर्च सांगण्यात आला होता. मात्र एवढा खर्च करण्याऐवजी मोटार ट्रान्स्पोर्ट विभागात बसवलेल्या मशीन वापरात नसल्याने तिचे काही पार्ट काढून आयुक्तालयातील मशीन दुरुस्त केले होते; परंतु नंतर देखभालीअभावी पुन्हा मशीन वर्षभरापासून बंद पडल्याने धूळ खात पडले आहे. २०१६ पासून आयुक्तालयातील बंद पडलेल्या मशीनबाबत बिनतारी विभागाला सुरक्षा विभागाने माहिती दिली होती; मात्र तत्कालीन मुख्यालय उपायुक्तांनी मशीनच्या दुरुस्तीचा कारभार बिनतारी विभागाकडून सुरक्षा विभागाकडे हस्तांतरित केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सुरेश कन्नलू यांनी दिली. 

पोलिस आयुक्तालयात पासपोर्ट कार्यालयासह पोलिस आयुक्त व शस्त्रागारासारखे महत्त्वाचे विभाग आहेत. या ठिकाणी रोज अनेक नागरिक येतात. अशातच सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होत असल्यामुळे तत्कालीन आयुक्तांनी प्रवेशद्वारावर झेरॉक्‍स स्कॅनिंग बसवण्याचा निर्णय घेतला होता; मात्र दोन्ही स्कॅनिंग मशीन बंद आहेत. त्यामुळे पुन्हा सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com