कुणाला धक्का कुणाला ठेंगा?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

मुंबईकरांचा कौल कुणाला? आज मतदान
मुंबई - सर्वच पक्षांनी आक्रमकपणे राबवलेली प्रचार मोहीम पाहिल्यानंतर मंगळवारच्या (ता. 21) मतदानासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणे मुंबईकर या वेळीही राजकीय पक्षांना आश्‍चर्याचा धक्का देतात की, विधानसभा निवडणुकीतील कलच कायम राहील, याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मुंबईकरांचा कौल कुणाला? आज मतदान
मुंबई - सर्वच पक्षांनी आक्रमकपणे राबवलेली प्रचार मोहीम पाहिल्यानंतर मंगळवारच्या (ता. 21) मतदानासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणे मुंबईकर या वेळीही राजकीय पक्षांना आश्‍चर्याचा धक्का देतात की, विधानसभा निवडणुकीतील कलच कायम राहील, याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

35 हजार कोटींच्या मुंबई महापालिकेच्या चाव्या कोणाकडे द्यायच्या? याचा निर्णय मुंबईकर उद्या घेतील. त्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपला 100 जागा मिळतील, असे फारसे कोणाला वाटले नव्हते. कारण दोन वर्षे आधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईकर मतदारांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला कौल दिला होता. तरीही मुंबईकरांनी सर्वांचे आडाखे चुकवीत महापालिकेत शिवसेना-भाजपला बहुमत दिले. आता मोदी लाटेत लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही मतदारांनी शिवसेना-भाजपला भरभरून मते दिली असताना मुंबईकर वेगळा विचार करतील का? याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

या वेळच्या निवडणुकीपूर्वी अनेक उलथापालथी झाल्या. उमेदवारी न मिळाल्याने प्रभाकर शिंदे, नाना आंबोले यांच्यासारखे शिवसेनेतील बिनीचे शिलेदार भाजपमध्ये गेले. तर मनसेचे दीपक पवार यांनी शिवसेनेची आणि मंगेश सांगळे यांनीही भाजपची वाट धरली. शिवसेना आणि भाजप यांची युती फिसकटल्याने या वेळी अत्यंत आक्रमकपणे प्रचार करण्यात आला. प्रचार सभांखेरीज प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्येही या दोन्ही पक्षांच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले. सेना-भाजपच्या नेत्यांनी एकमेकांना शेलक्‍या विशेषणे वापरली. उद्धव यांनी प्रचारात घेतलेली आघाडी, मुख्यमंत्र्यांचे आक्रमक धोरण, राज ठाकरे यांनी प्रचारास केलेला उशीर आणि मुंबईत दुर्लक्षित राहिलेला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रचार, अशी या वेळच्या प्रचाराची वैशिष्ट्ये होती.

उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून अर्धवटराव, हास्यास्पद विधाने करणारे, पोरकट अशी विशेषणे वापरलीच; पण पंतप्रधानांवरही त्यांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांनीही शिवसेनेवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करताना "मातोश्री'लाही त्यात ओढले. नरेंद्र मोदी या प्रचारात सहभागी न झाल्याने कार्यकर्त्यांचा विरस झाला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, कॉंग्रेसचे दिग्विजयसिंह, ज्योतिरादित्य शिंदे आदी राष्ट्रीय नेत्यांनी आपापल्या पक्षांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. तर मुंबई प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी जवळपास एकहाती किल्ला लढवला. राज ठाकरे यांनी शेवटच्या आठवड्यातच प्रचार केल्याने त्यांचे नाशिकमध्ये केलेल्या कामाचे प्रेझेंटेशन फारसा प्रभाव टाकू शकले नाही. मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातील सभेला आणि अशोक चव्हाण यांच्या नाशिकमधील सभेला मिळालेला अत्यल्प प्रतिसाद याचीही पुष्कळ चर्चा झाली.

खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील, शिवसेनानेते विनोद घोसाळकर यांची सून तेजस्वी, मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांची पत्नी स्वप्ना देशपांडे, खासदार राहुल शेवाळे यांची पत्नी कामिनी आणि वहिनी वैशाली अशा नातलगांची फौजही रिंगणात आहे. त्यामुळे खरे पाहता या नेत्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Web Title: municipal election mumbai