नक्षलवाद्यांनी घडवला होता मुंबईतील कंपनीत संप

अनिश पाटील
शुक्रवार, 25 मे 2018

मुंबई - राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये प्राबल्य असलेल्या नक्षलवाद्यांनी मुंबईतही पाय खोलवर रोवले आहेत. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या नक्षलवाद्यांनी वीजपुरवठा करणाऱ्या देशातील अग्रगण्य कंपनीचे कामकाज 19 डिसेंबर 2017 ला बंद पाडले होते. त्याचा फटका वीज सेवेला बसला होता. एटीएसने अटक केलेल्या आठ नक्षलवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

एटीएसने अटक केलेल्या या नक्षलवाद्यांच्या चौकशीत ग्रामीण भागात प्रबळ असलेल्या नक्षलवादाने मुंबईतील अनेक उद्योगांमधील कामगार संघटनांमध्येही प्रवेश केल्याची माहिती उघड झाली आहे. कृष्णा लिंगय्या ऊर्फ अजय दासरी (वय 40), सत्यनारायण कर्रेला (40), बाबू वांगुरी (30), शंकरय्या गुंडे (40), रमेश गोलला (37), नरसय्या जुंपला (52) व साईधुल सिंगप्पा या संशयित नक्षलवाद्यांना अटक केली होती.

एटीएसने बेकायदा कृती प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) विविध कलमांतर्गत नुकतेच 5,876 पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यानुसार कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाशी (माओवादी) संबंधित हे संशयित नक्षलवादी उत्तर महाराष्ट्र, दक्षिण गुजरात आणि मुंबईतील शहरी परिसरात काम करत होते. त्याला नक्षलवाद्यांनी सांकेतिक भाषेत "गोल्डन कॉरिडोर' नाव दिले असून, त्या अंतर्गत परिसरातील कामगार संघटनांमध्ये नक्षलवाद्यांना शिरकाव करायचा आहे. या माध्यमातून तेथील तरुणांना नक्षलवादी बनवण्याचे त्यांचे कारस्थान आहे.

याच कामगार संघटनांच्या माध्यमातून विजेसारखी अत्यावश्‍यक सेवा पुरवणाऱ्या देशातील एका अग्रगण्य कंपनीचे कामकाज या नक्षलवाद्यांनी बंद पाडले होते. तसेच, या कंपनीला कामगार पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांना धाक दाखवून त्यांच्याकडून नक्षलवाद पोसण्यासाठी बॅंक खात्यावर पैसे जमा करून घेतल्याचेही तपासात उघड झाले आहे.

Web Title: The Naxalite had strike a company in Mumbai