पाणीटंचाईच्या दुष्टचक्रातून बेडीसगावची सुटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

साद फाउंडेशनच्या पुढाकाराने दोन सिमेंट बंधारे

साद फाउंडेशनच्या पुढाकाराने दोन सिमेंट बंधारे
नेरळ - कर्जत तालुक्‍यातील शेलू ग्रामपंचायतीमधील बेडीसगावाला पाणीटंचाईच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी अंबरनाथच्या साद फाउंडेशनने त्या भागात दोन सिमेंट बंधारे उभारले आहेत. उन्हाळ्यात या भागातील पाणीटंचाईचा अभ्यास करून साद फाउंडेशनने हा उपक्रम राबवला. यातून पाणीटंचाईवर मात करता येईल, असा विश्‍वास शेलू ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे.

कर्जत तालुक्‍यातील आदिवासी भागात उन्हाळ्याचे चार महिने पाणीटंचाईची समस्या तीव्र असते. एप्रिल, मेमध्ये तर आदिवासी कुटुंबातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी एक ते दीड किलोमीटर पायपीट करावी लागते. विद्यार्थ्यांनाही ऐन परीक्षेच्या काळात पाण्यासाठी भटकावे लागते. बेडीसगावात शिक्षण व आरोग्यावर गेल्या सहा वर्षांपासून काम करण्याऱ्या साद फाउंडेशनच्या सदस्यांना ही समस्या प्रकर्षाने जाणवली. यातूनच "साद'चे संस्थापक प्रदीप कुलकर्णी यांनी सिमेंट बंधारे बांधण्याचा अनुभव असणारे हेमंत जगताप यांना यंदाच्या उन्हाळ्यात बेडीसगावला आणले. जगताप यांनी परिसराचा अभ्यास करून, बंधारा बांधण्याची जागा निश्‍चित केली. साद फाउंडेशनच्या आर्थिक बळावर आणि बेडीसगावातील ग्रामस्थांच्या श्रमदानातून सिमेंट कॉंक्रीटचे दोन बंधारे बांधण्यात आले. साडी-चोळी अर्पण करून त्यांचे लोकार्पण करण्यात आले.

रोटरी क्‍लब (अंबरनाथ), आर्ट ऑफ लिव्हिंग, स्वच्छंद ग्रुप, मैत्र जीवांचे या संस्थांनीही बंधाऱ्यांसाठी सहकार्य केले. बंधाऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्याला व्यक्ती विकास केंद्राचे विश्‍वस्त कृष्ण कुमार, शेलू ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री मसणे, उपसरपंच गुरुनाथ मसणे रोटरी क्‍लब (अंबरनाथ)चे अध्यक्ष देवेंद्र जैन आदी उपस्थित होते. या वेळी शेलू ग्रामपंचायतीतर्फे प्रदीप कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

बंधारे भरले तुडुंब
यंदाचा पावसाळा सुरू झाल्यापासून हे बंधारे पाण्याने ओसंडून वाहू लागले आहेत. त्यातील एका बंधाऱ्यात 45 लाख, तर दुसऱ्यात 30 लाख लिटर पाणी साठले आहे. बंधारे 22 मीटर लांब आणि 4 फूट उंचीचे आहेत.