पत्रकार कक्षाची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नवी मुंबई - श्रीमंत महापालिका असा नावलौकिक असलेल्या महापालिकेच्या पत्रकार कक्षाची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने कक्षातील पंखे, संगणक, टीव्ही या वस्तूंची नासधूस झाली आहे. या कक्षात कुणीही येत-जात असल्यामुळे सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी पत्रकारांनी केली होती. परंतु त्यालाही पालिकेने केराची टोपली दाखवल्यामुळे पत्रकार कक्षाची सुरक्षा रामभरोसे आहे.

बेलापूर येथील पाम बीच रोडवर किल्ले गावठाणासमोर महापालिका मुख्यालयाची आलिशान इमारत आहे. या इमारतीत पत्रकारांसाठी एक कक्ष तयार केला आहे. मात्र त्यासाठी उपाहारगृहाजवळची अडगळीची जागा निवडली. एक लांबलचक टेबल व त्याच्या कडेला खुर्च्या ठेवून पत्रकारांची बोळवण केली. सध्या बातम्या पाठवण्यासाठी संगणकाचा वापर होत असताना महापालिकेने मात्र फॅक्‍ससारखी जुनी यंत्रणा पत्रकारांना देऊन थट्टाच केली आहे. 

इलेक्‍ट्रॉनिक्‍स माध्यमांच्या प्रतिनिधींनी तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांना संगणक देण्याची विनंती केल्यावर प्रशासनाने दोन संगणक दिले. त्यानंतर आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकारांसाठी आणखी दोन संगणक दिले. महापालिकेची वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने त्यांनी कक्षात दोन पंखेही बसवले. पत्रकारांसाठी महापालिकेने तयार केलेल्या लॉकरचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीत वाटप केले. टीव्ही दिला. पत्रकार कक्षात अशा वस्तू असल्यामुळे सुरक्षा रक्षक व सीसी टीव्ही बसवण्याची मागणी पत्रकार संघटनांनी अधिकाऱ्यांकडे केली होती. परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने पत्रकार कक्षातील दोन संगणकांची नासधूस झाली आहे. दोन पंखे गायब झाले आहेत. लॉकरची सुरक्षा वाऱ्यावर आहे. यामुळे या कक्षात अनुचित घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे.