जकातीला पर्याय पार्किंग कराचा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

पालिकेला दरवर्षी मिळणार सात हजार कोटी
मुंबई - महापालिका जकात रद्द करून त्याऐवजी नवा पार्किंग कर लागू करण्याची दाट शक्‍यता आहे. तसे झाल्यास पालिकेला दरवर्षी सहा ते सात हजार कोटी उत्पन्न मिळू शकेल. जकात रद्द होऊन जीएसटी लागू झाल्यानंतर महसुलात पडणारा खड्डा भरून नवा कर लागू केला जाईल, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

पालिकेला दरवर्षी मिळणार सात हजार कोटी
मुंबई - महापालिका जकात रद्द करून त्याऐवजी नवा पार्किंग कर लागू करण्याची दाट शक्‍यता आहे. तसे झाल्यास पालिकेला दरवर्षी सहा ते सात हजार कोटी उत्पन्न मिळू शकेल. जकात रद्द होऊन जीएसटी लागू झाल्यानंतर महसुलात पडणारा खड्डा भरून नवा कर लागू केला जाईल, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.

एप्रिलपासून जकातऐवजी जीएसटी लागू होणार आहे. पालिकेच्या महसुलाचा कणा असलेली जकात 1965 पासून सुरू आहे. त्यापूर्वी पालिका नगरशुल्क आकारत होती. गुजरात, हरयाना, महाराष्ट्र, ओरिसा, पंजाब आणि पश्‍चिम बंगालमध्ये जकात कर अस्तित्वात होता. एकूण महसुलाच्या 45 टक्‍के महसूल जकातीपासून मिळतो; मात्र जीएसटी लागू झाल्यास या महसुलावर पाणी सोडावे लागेल.

मुंबईत 20 लाख वाहने आहेत. त्यांना पार्किंगसाठी जागाच नाही. शहरात चर्चगेट, रिगल, लोअर परळ, दादर, प्रभादेवी, बोरिवली, ऑबेरॉय मॉल, मालाड, बीकेसी, अंधेरी, साकीनाका, जुहू, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्‍स, कलानगर आदी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे; मात्र मुंबईत दररोज येणाऱ्या वाहनांना पार्किंगसाठी ही जागा अपुरी पडत आहे. वाहने खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोसायट्यांमध्येही आता वाहनांच्या पार्किंगसाठी जागा नाही. त्यामुळे सोसायट्यांमधील रहिवाशीही रस्त्यांवर बेकायदा पार्किंग करतात. रात्रभर वाहने रस्त्यावर उभी राहतात. त्यामुळे पार्किंगची समस्या वाढत आहे.

पार्किंग कर आकारून महसूल उभा करण्याच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत. मुंबईतील एकूण वाहनांपैकी निम्मी म्हणजे सुमारे 10 लाख वाहने रस्त्यांवर बेकायदा उभी केली जात आहेत. त्यामुळे या वाहनांवर पार्किंग कर आकारून त्यांना शिस्त लावली जाईल, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. यातून वर्षाला सात हजार कोटी महसूल मिळवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. शिवसेना या नव्या कराबाबत सकारात्मक असून भाजपचा मात्र त्याला विरोध आहे. कर आकारताना ही योजना प्रभावीपणे राबवून त्याच्यातून महसूल कसा मिळेल, यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. मुंबईत विकसकांनी बांधलेले सुमारे 67 पार्किंग प्लॉट अद्याप पालिकेने ताब्यात घेतलेले नाहीत.

नव्या कराला आमचा विरोध
कोणताही नवा कर आम्ही मुंबईतील नागरिकांवर लादू देणार नाही. पार्किंग कर किंवा तत्सम कोणताही नवा कर लागू केल्यास भाजप त्याला कडाडून विरोध करेल, असा इशारा भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी दिला आहे. त्यामुळे नव्या पार्किंग करावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपण्याची शक्‍यता आहे.