शिवसेनेच्या संपर्क यात्रेसाठी ज्येष्ठ मावळ्यांना आवतण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

मुंबई - शिवसंपर्क यात्रेला आमदारांनी दांडी मारल्यामुळे आता जुन्या शिवसैनिकांची आठवण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील संपर्क यात्रेच्या बैठकीसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, सुधीर जोशी आणि लीलाधर डाके यांना बोलावण्यात आले. या जुन्या मावळ्यांची जुनी "कर्तबगारी' सांगत आता संपर्क यात्रेत सहभागी न होणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात येईल, असा दमच पक्षप्रमुखांनी भरला आहे.

मराठवाड्यातील शिवसंपर्क यात्रेत 40पैकी 27 आमदार सहभागी झाले नाहीत. त्यामुळे ठाकरे चांगलेच संतापले आहेत. या संपर्क यात्रेचा पुढचा टप्पा नाशिकमधून लवकरच सुरू होणार आहे. त्याच्या तयारीसाठी शुक्रवारी "शिवसेना भवना'त बैठक झाली. या वेळी पक्षनेतृत्वापासून गेल्या वर्षापासून लांब गेलेले मनोहर जोशी सहभागी झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. सुधीर जोशी आणि लीलाधर डाके हे जुने नेतेही या वेळी उपस्थित होते. या तिन्ही नेत्यांना ठाकरे यांनी बोलावले होते असे समजते.

शिवसंपर्क यात्रेत सहभागी न झालेल्या आमदारांकडे नंतर बघेनच; पण यापुढील संपर्क यात्रेत जे सहभागी होणार नाहीत त्यांना थेट घरचा रस्ता दाखवण्यात येईल, असा इशारा ठाकरे यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

शिवसंपर्क अभियानाच्या पुढच्या टप्प्याबाबत या बैठकीत चर्चा झाली, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले. आमदार संपर्क यात्रेत सहभागी झाले नसल्याची माहिती खोटी आहे, असा दावाही त्यांनी केला.