मुंबईत आरेच्या तलावात बुडून एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

मुंबई: आरे कॉलनीतल्या चित्रनगरी तलावात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.14) रात्री घडली.

मुंबई: आरे कॉलनीतल्या चित्रनगरी तलावात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.14) रात्री घडली.

नासीर खान (30) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी आरे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून त्याचा मृतदेह शवविच्छेदनाकरता पाठवला आहे.
नासीर हा व्यवसायाने रंगारी असून, तो गोरेगावच्या नागरी निवारा येथे राहत होता. रविवारी सायंकाळी नासीरसह त्याचे पाच मित्र हे चित्रनगरीतील तलावाजवळ फिरायला आले होते. सायंकाळच्या सुमारास नासीर आणि त्याचा एक मित्र हे तलावात पोहण्याकरता उतरले. नासीरला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. याची माहिती नासीरच्या मित्राने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन दलाला माहिती कळवली. काही वेळाने आरे पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान तलावाजवळ आले. रात्र असल्याचे अग्निशमन दलाला बचाव कार्यात अडचणी येत होत्या. आज (सोमवार) सकाळी अग्निशमन दलाच्या जवानांनी नासीरचा मृतदेह तलावातून बाहेर काढला.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरता सिद्धार्थ रुग्णालयात पाठवला.