कर्नाळा अभयारण्यात परदेशी पाहुणे

कर्नाळा अभयारण्यात परदेशी पाहुणे

नवीन पनवेल - पनवेलपासून १२ किलोमीटर अंतरावर कर्नाळा पक्षी अभयारण्यात परदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. यात पिंटेल डक, ककू, राईनेक, ब्ल्यू रॉक थ्रश, ट्रीपीपीट यांचा समावेश आहे. हिवाळ्यात या ठिकाणी येणाऱ्या परदेशी पक्ष्यांची संख्या मोठी असते.

पिंटेल डक हा पक्षी युरोप, आशिया आणि अमेरिका खंडाच्या उत्तरेकडील भागात आढळतो. थंडीच्या हंगामात दक्षिणेकडे स्थलांतर करतो. ककू हा पक्षीसुद्धा युरोपातून या काळात स्थलांतर करतो. कीटक आणि अळ्या हे त्यांचे मुख्य खाद्य आहे. विणीचा हंगाम असल्यामुळे हे पक्षी अंडी देण्यासाठी या भागात स्थालांतरण करतात. व्रईनेक हा पक्षी युरोप आणि आशिया खंडात आढळतो.

ब्ल्यू रॉक थ्रश हा पक्षी युरोपातील दक्षिणेकडील भागात, उत्तर आफ्रिका, चीनच्या उत्तर भागात आढळतो. ब्ल्यू रॉक थ्रश दिवसाला तीन ते पाच अंडी घालतो. कीटक आणि छोटे सरपटणारे प्राणी हे त्यांचे मुख्य खाद्य आहे. ट्रीपीपीट हा पक्षी दिसायला चिमणीसारखा दिसतो. युरोप आणि मध्य आशिया खंडांत ट्रीपीपीट आढळतो. साधारणपणे दरवर्षी दोनदा हे सर्व पक्षी येथे स्थलांतर करतात. मध्य आशिया, युरोप, उझ्बेकिस्तान, सायबेरियातून हे पक्षी येथे येतात. कर्नाळा अभयारण्यात सदाहरित, खारफुटी तसेच पानगळीची वने आढळतात. यात विविध प्रकारच्या ६०० वृक्षांच्या जाती अस्तित्त्वात आहेत. त्यामुळे पक्ष्यांना लागणारे विविध प्रकारचे खाद्य येथे उपलब्ध होते.

थंडीच्या हंगामात स्थलांतर
युरोपातील देशांत भारतापेक्षा जास्त थंडी असते. त्यामुळे साधारणपणे चार महिन्यांच्या कालावधीसाठी पक्षी या ठिकाणी स्थलांतर करतात. हिवाळ्याच्या सुरुवातीला हे आपल्याकडे येतात. फेब्रुवारीच्या आसपास आपल्या पिलांसह परतीचा प्रवास करतात.

पक्ष्यांच्या आवश्‍यक आरोग्य सुविधा
कोकॅटो नावाचा पक्षी येथील विशेष आकर्षणाचा पक्षी आहे. हा पक्षी सिंगापूर देशात आढळतो. वन्य जीवन गुन्हे नियंत्रण विभागातर्फे ३५ कोकॅटो पक्षी कर्नाळा अभयारण्यात ठेवण्यात आले आहेत. हे पक्षी जखमी झाल्यास त्यांना आवश्‍यक आरोग्य सुविधा या ठिकाणी देण्यात येतात, यानंतर त्यांना जंगलात सोडण्यात येते.

वातावरण आणि विणीचा हंगाम या दोन्हींसाठी योग्य ठिकाण म्हणून कर्नाळा अभयारण्यात पक्षी स्थलांतर करतात. एकूण ६०० च्या आसपास झाडांच्या प्रजाती असल्यामुळे पक्ष्यांना योग्य खाद्य या ठिकाणी  सहज मिळते.
- प्रदीप पांडुरंग चव्हाण, परिक्षेत्र वन अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com