पप्पू सर्वांनाच हवाहवासा  

पप्पू सर्वांनाच हवाहवासा  

उल्हासनगर - उल्हासनगरमधल्या निवडणुका पप्पू कलानीच्या नावाशिवाय ना सुरू होत; ना संपत. अगदी पप्पू कलानी शहरात असो किंवा नसो. यंदाच्या पालिका निवडणुकीत शहरात भाजपच्या बॅनरवर मोदींच्या रांगेत त्याचे छायाचित्र असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शहरातला राजकीय इतिहास पहाता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पक्षांनासुद्धा पप्पूची भुरळ पडली होती. यंदा ती भाजपला पडली आहे. यावरून अजूनही पप्पूचा शहरात चांगलाच दबदबा आहे, हे स्पष्ट होते.

कलानीने तीन दशके उल्हासनगरवर अधिराज्य गाजवले. १९९० ते २००९ या कालावधीत त्याने आमदारकीची खुर्ची सातत्याने टिकवली. पालिका अस्तिवात येण्यापूर्वी शहरात काँग्रेसचा दबदबा होता. त्या वेळी पप्पूची शहरात जबरदस्त दहशत होती. काँग्रेसनेही पप्पूची लोकप्रियता पाहून राजकीय फायद्यासाठी थेट आमदारकीचे तिकीट त्याला देऊ केले होते. पप्पूची जादू जनमानसात चालली आणि काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा म्हणजेच १९९० मध्ये तो आमदार म्हणून निवडून आला.  

राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर पप्पूच्या लोकप्रियतेला बारामतीचे घड्याळही भुलले. पप्पूने मनगटावर घड्याळ चढवताच राजकीय वातावरण ढवळून निघाले होते; मात्र गनिमी कावा खेळण्यात पारंगत असलेल्या बारामतीने अप्रत्यक्षरीत्या पप्पूला पडद्याआडून पाठिंबा दिला, अशीही चर्चा होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पप्पूची पत्नी ज्योती कलानी यांनी आमदारकी  लढवली आणि जिंकलीसुद्धा. मात्र मधल्या काळात पप्पूची गुन्हेगारी पार्श्वभूमी त्रासदायक ठरू लागली. ‘टाडा’फेम म्हणून तो ओळखला जाऊ लागला. अनेक गंभीर  गुन्ह्यांमुळे तो अडचणीत येऊ लागताच अनेकांनी त्याच्यापासून चार हात दूर राहणे पसंत केले. 

सुरुवातीला काँग्रेस, त्यानंतर दोनदा अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीने सावध पवित्रा घेत त्याला आमदारकीचे तिकीट नाकारले होते. यंदाच्या पालिका निवडणुकीत ओमी कलानी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणाऱ्या रिपब्लिकननेच २००४ मध्ये पप्पूसाठी  पायघड्या घालून आमदारकीसाठी उभे केले होते. विशेष म्हणजे ही निवडणूकसुद्धा पप्पूने जिंकली.

कलानी आडनावाचा मोह सुटेना 
२००९ मध्ये मात्र पप्पूला आमदारकी मिळवता आली नाही. त्यानंतर २०१४ मध्ये ज्योती कलानी पुन्हा राष्ट्रवादीकडून आमदार म्हणून निवडून आल्या. पप्पूचा मुलगा ओमी यांना सध्या ‘वर्षा’ने जवळ केले असले, तरी दिल्लीपासून ते बारामतीपर्यंत सर्वांनाच कलानी आडनावाचा मोह अजूनही आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com