तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात याचिका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

मुंबई - बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई केल्याने चर्चेत आलेले नवी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात नवी मुंबईतील नागरिकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मुंढे यांची बदली रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. नवी मुंबईच्या आयुक्तपदी मुंढे यांची गेल्या वर्षी मेमध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अनेक गैरप्रकार आणि गैरव्यवहार उघडकीस आणले.

अलीकडेच त्यांची बदली पुण्यात करण्यात आली आहे; मात्र त्यांची बदली राज्य सरकारने राजकीय दबावामुळे केल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

मुंढे यांच्या कामाच्या पद्धतीमुळे राजकीय नेत्यांची अडचण झाली होती. त्यामुळेच त्यांची बदली करण्यात आली, असे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर लवकरच नियमित न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Web Title: petition of tukaram munde transfer