पिंपरीत पालिका विद्युत विभागाच्या साहित्याची भंगारात विक्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

महापालिका विद्युत विभागातील साहित्य पिंपरी-शास्त्रीनगर (प्रभाग 21) येथील एका भंगार दुकानात सोमवारी (ता. 19) विद्युत विभागाच्याच एका अधिकाऱ्याने विक्री केल्याची धक्कादायक माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून समजली आहे.

पिंपरी - महापालिका विद्युत विभागातील साहित्य पिंपरी-शास्त्रीनगर (प्रभाग 21) येथील एका भंगार दुकानात सोमवारी (ता. 19) विद्युत विभागाच्याच एका अधिकाऱ्याने विक्री केल्याची धक्कादायक माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून समजली आहे.

महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात स्वतंत्र विद्युत विभाग कार्यरत आहे. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रभागात विद्युत विभागाचे कार्य चालते. अधिकाऱ्याने विकलेले अनेक साहित्य चांगल्या दर्जाचे होते. काही साहित्य बॉक्‍समध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भंगारवाल्याने साहित्याची तोडफोड करून ते भंगारात जमा केले. याबाबत विचारणा करणाऱ्या नागरिकाला विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्याने दमदाटी करून "कशाला या प्रकरणात पडतो, तुला काय मार खायचा का?' असा दम दिल्याचे कळते. विद्युत विभागातील हा गोरखधंदा किती दिवसांपासून सुरू आहे, याची चौकशी करण्याची मागणी काही नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित भंगार दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यास सत्य बाहेर येईल, असेही त्या सूत्रांनी सांगितले.

विद्युत विभागातील भंगार किंवा टाकाऊ साहित्याची वर्षा दोन वर्षांनी निविदा काढून विक्री केली जाते. महापालिकेचे साहित्य बाहेर विक्री करता येत नाही. तसे झाले असल्यास या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.
- प्रवीण तुपे, सहशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका.