भिवंडीत निवडणुकीसाठी पोलिस दल सज्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

भिवंडी - भिवंडी महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक निर्भय व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी येथील पोलिस दल सज्ज झाले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी हिटलिस्टवर असलेल्या गुन्हेगारांवर हद्दपार व प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरवात केली आहे. प्रथम टप्प्यात गुंडांना हद्दपार करण्यात येणार असून त्यानंतर "मोका' कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. काही व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीत अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे, अशी माहिती पोलिस उपयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेची निवडणूक 24 मे रोजी होणार असल्याने पालिका प्रशासन व पोलिस दलाने तयारी सुरू केली आहे.