वांद्र्यातील प्रदूषणाचा मीटर खाली

वांद्र्यातील प्रदूषणाचा मीटर खाली

हवा शुद्धीकरण यंत्रणा बसविल्याचा परिणाम... प्रदूषण नियंत्रणासाठी सहा महिने लागणार...

मुंबई - वांद्रे कलानगरमध्ये हवा शुद्धीकरण यंत्रणा बसवल्यानंतर १० दिवसांत आशेचा किरण दिसू लागला आहे. प्रदूषणाच्या पातळीत किंचित घट झाली आहे. महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वांद्रे स्थानकातील हवेची गुणवत्ता सुधारण्यास सुरुवात झाली आहे. वांद्र्यातील हवेची गुणवत्ता १८६ प्रति घनमीटरपर्यंत आल्याची नोंद ११ जानेवारीपर्यंतच्या नोंदीत झाली आहे. 

१ जानेवारी रोजी वांद्र्यातील धूलिकणांची मात्रा २७१ प्रति घनमीटर एवढी होती. मात्र, ५ जानेवारीला हवा शुद्धीकरण यंत्रणा बसविल्यानंतर धूलिकणांची मात्रा तब्बल २०० च्या खाली आली आहे. मात्र, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबईतील इतर स्थानकांवरील यंत्रणा सुरू होणे गरजेचे आहे. त्यानंतर हळूहळू मुंबईतील हवेतील प्रदूषण घटण्यास सुरुवात होईल. त्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती एमपीसीबीच्या पी. मिराशे यांनी ‘सकाळ’ला दिली. नुकतीच सायनमधील हवा शुद्धीकरण यंत्रणाही कार्यान्वित झाली आहे. कालांतराने भांडुप, घाटकोपर व सीएसटीजवळ ही यंत्रणा बसवली जाईल. 
 

काय आहे हवा शुद्धीकरण यंत्रणा

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, निरी व आयआयटीच्या संयुक्त विद्यमाने हवा शुद्धीकरण यंत्रणा बसवण्यात येत आहे. मशीनमधील वरच्या भागात फिल्टर बसवण्यात आले असून सूक्ष्म धूलिकण, कार्बन मोनॉक्‍साइड आदी शोषून घेण्याची क्षमता त्यात आहे. फिल्टरच्या बाजूला प्रदूषकांवर उष्ण तापमान दिले जाण्याची हिटिंग मशीन बसवण्यात आली आहे. हिटिंगमधील कार्बन मोनॉक्‍साइडचे प्रमाण घटत त्याचे रूपांतर कार्बन डाय-ऑक्‍साईडमध्ये होईल. या प्रक्रियेत किमान ५० टक्के प्रदूषणात घट होते. 

हवा शुद्धीकरण यंत्रणेची मशीन सध्या विजेवर सुरू असून, लवकरच ती सौरऊर्जेवर सुरू केली जाईल. मात्र, वांद्र्यातील मशीनसाठी सौर पॅनेल शोधण्याचे दिव्य सध्या एमपीसीबीचे अधिकारी करत आहेत. शिवाय सायंकाळनंतर मशीन सुरू राहण्यासाठी बॅटरी चार्जरची आवश्‍यकता आहे. या प्रक्रियेला विलंब होण्याची शक्‍यता असल्याने तूर्तास विजेवर मशीन सुरू राहील, अशी माहिती आयआयटीचे प्रा. वीरेन शहा यांनी दिली. मशीनमधील हिटिंग प्रक्रियेत वीज जास्त वापरली जात असल्याने भविष्यात अजून काही बदल घडतील, असेही ते म्हणाले. 

वांद्र्यातील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा 
(आकडे प्रति घ. मी.मध्ये) 

५ जानेवारी - २१७
६ जानेवारी - १५६
७ जानेवारी - १४७
८ जानेवारी - १२१ 
९ जानेवारी - उपलब्ध नाही
१० जानेवारी - १५७
११ जानेवारी - १८६ 
(१२ ते ५ जानेवारीपर्यंतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध नाही) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com