गर्भवती महिलेला पेटवून तिसऱ्या मजल्यावरून फेकले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

उल्हासनगरमध्ये पतीसह चौघांवर गुन्हा
दीपाच्या मृत्यूबाबत तिची आई सुमित्रा वायले यांनी संशय व्यक्त करून दीपाचा खून झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती.

उल्हासनगर : सहा महिन्यांच्या गर्भवतीला पेटवून देत तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून तिची हत्या करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उल्हासनगरातील हिल लाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या पतीसह सासू, दीर आणि जाऊ यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

मौजे उसाटणे येथील विश्‍वास पाटील याचे दीपा (वय 26) हिच्याशी 2011मध्ये विवाह झाला होता. या दाम्पत्याला सहा वर्षांचा एक मुलगा आहे. दीपा सहा महिन्यांची गरोदर होती. तीन वर्षांपासून क्षुल्लक कारणावरून पती विश्‍वास, सासू सीताबाई, दीर संजय आणि जाऊ सुरेखा दीपाचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. तसे दीपाने वेळोवेळी आईला सांगितले होते.

काही दिवसांपूर्वी दीपाच्या आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिस ठाण्यात झाली होती. मात्र, दीपाच्या मृत्यूबाबत तिची आई सुमित्रा वायले यांनी संशय व्यक्त करून दीपाचा खून झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. पतीसह सासू, दीर आणि जाऊ दीपाचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. त्यांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिले, असे सुमित्रा यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी सीताबाई, विश्‍वास, संजय आणि सुरेखा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.