राजभवनातील बंकरचे लवकरच स्ट्रक्‍चरल ऑडिट - सी. विद्यासागर राव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

मुंबई - राजभवनाच्या तळाशी असलेल्या ब्रिटिशकालीन वॉर रूम (बंकर)मध्ये पोटमाळा आहे. त्याचे ऐतिहासिक गुपित लवकरच उघड होण्याची शक्‍यता आहे. बंकरची वास्तुरचना अचंबित करणारी असून, गुरुवारी राजभवनात याबाबत बैठक होणार आहे. त्यात संशोधनाची दिशा ठरवली जाणार आहे. या बंकरचे लवकरच स्ट्रक्‍चरल ऑडिट होणार असल्याची माहिती राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी दिली.

मुंबई - राजभवनाच्या तळाशी असलेल्या ब्रिटिशकालीन वॉर रूम (बंकर)मध्ये पोटमाळा आहे. त्याचे ऐतिहासिक गुपित लवकरच उघड होण्याची शक्‍यता आहे. बंकरची वास्तुरचना अचंबित करणारी असून, गुरुवारी राजभवनात याबाबत बैठक होणार आहे. त्यात संशोधनाची दिशा ठरवली जाणार आहे. या बंकरचे लवकरच स्ट्रक्‍चरल ऑडिट होणार असल्याची माहिती राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी दिली.

या बैठकीत इतिहासकार, पुरातत्त्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, इंटेलिजन्स विभाग अशा संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित असतील. यात या बंकरबाबत संशोधन आणि अभ्यासाची दिशा ठरणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी या बंकरची पाहणी केली असता, एक पोटमाळा आढळला आहे. यातून ऐतिहासिक गुपिते उलगडण्याचा दावा करण्यात येत आहे.

ब्रिटिशकालीन वास्तुकलेचा नमुना
राजभवनात सापडलेली बंकर ही ब्रिटिशकालीन वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. या बंकरमधील ड्रेनेज व्यवस्था आणि हवा खेळती राहण्यासाठी अवलंबलेली पद्धत हा बांधकामाचा उत्तम नमुना आहे. त्याचा अभ्यास करणे आवश्‍यक आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कृष्णा घोगरे यांनी सांगितले. साधारण 20 फुटांचा हा बंकर असावा. सध्या बंकरच्या प्रवेशापासून खालच्या मजल्यावर 12 फूट उंचीचे बांधकाम आहे. त्यावर आणखी आठ ते 10 फुटांचे बांधकाम असण्याची शक्‍यता असल्याचे ते म्हणाले. राजभवनाच्या बरोबर दरबार हॉलनजीक खालच्या बाजूला संपणाऱ्या बंकरच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी गळती आणि माती पडलेली आहे. संपूर्ण बंकरच्या 12 फूट उंचीच्या तुलनेत या ठिकाणी उंची सहा ते सात फूट इतकी आहे; पण इतर ठिकाणी ती बारा फुटांपर्यंत आहे. पोटमाळ्याबाबतचे संशोधन झाल्यावर संपूर्ण उलघडा होईल. राजभवनशी संबंधित पीडब्ल्यूडीच्या नकाशांतही अशा प्रकारच्या भुयाराची नोंद नाही.

दारूगोळा नेण्यासाठी विशिष्ट पद्धत
राजभवनात दरबार हॉलच्या मागच्या बाजूला या बंकरमध्ये दारूगोळा उतरवण्यासाठी साखळदंडाची व्यवस्था आहे. 200 ते 250 किलोचा दारूगोळा उतरवण्यासाठी त्याचा वापर होत असावा, असा अंदाज आहे. तोफेच्या ठिकाणी दारूगोळा नेण्यासाठी दोन लिफ्टिंग मशीनची व्यवस्थाही आढळली आहे. राजभवन परिसराच्या सुरक्षेसाठी पोटमाळ्यावर दारूगोळा चढवण्यासाठी रचना असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. येथे तुटलेली शिडीही आढळली आहे.

बंकरमध्ये होणार "महाराष्ट्र दर्शन‘
बंकरच्या संपूर्ण जागेचा अधिकाधिक चांगला वापर करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. येथे थ्री-डी तंत्रज्ञानावर आधारित "महाराष्ट्राचे दर्शन‘ घडवण्याचा प्रयत्न असून त्याची चाचपणी केली जाईल, असे राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले. ही प्राथमिक संकल्पना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ऐतिहासिक नोंदी काय सांगतात?
1828 च्या नोंदींनुसार सिग्नल फ्लॅगस्टाफ आणि गन प्लॅटफॉर्मची नोंद आहे. समुद्राच्या दिशेने हवा खेळती राहण्यासाठी पाच मोठ्या छिद्रांची नोंदही राजभवनच्या 1868 च्या साईट प्लॅनमध्ये आहे. समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी तोफगोळ्यांसाठी विशिष्ट जागेची नोंद आहे. "राजभवन्स इन महाराष्ट्र‘ या पुस्तकात सदाशिव गोरक्षकार यांनी याचा उल्लेख केला आहे.

भुयारात पाहण्यासाठी काय?
- सुमारे 150 मीटर लांबी आणि तीन मीटर रुंदीचा भुयारी मार्ग.
- बंकरचे क्षेत्रफळ जवळपास 5000 चौरस फूट
- तीन पद्धतीच्या ड्रेनेज लाईन्स. एकाचा वापर हवा खेळती राहण्यासाठी
- दारूगोळा साठवण्यासाठीची जागा (गन शेल)
- 13 खोल्या (प्रत्येकाचा आकार वेगळा)
- शस्त्रे देखभाल-दुरुस्तीसाठी कार्यशाळा
- मध्यवर्ती तोफखाना विभाग

Web Title: Raj Bhavan bunker shortly structural audit - C. Vidyasagar Rao