शाळेची इमारत कधी?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्‍टकडे प्रस्ताव पाठवला आहे. लवकरच शाळेची नवीन इमारत बनणार आहे. 
- रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त, जी उत्तर विभाग

दादर - सर्व शिक्षण अभियानांतर्गत मुलांना मोफत शिक्षण देण्यात येत असताना माटुंगा लेबर कॅम्पमधील ‘राजर्षी शाहू विद्यालय’ ही शाळा नूतनीकरणाच्या नावाखाली चार वर्षांपूर्वी पाडण्यात आली; मात्र अद्यापही या शाळेची इमारत उभारण्याकडे ना पालिकेचे लक्ष, ना शिक्षण विभागाचे. चार वर्षांपासून या परिसरातील मुलांना शिक्षणासाठी अन्य विभागातील शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे त्यांची अवस्था शाळा कमी, प्रवास जास्त अशी झाली आहे.

माटुंगा लेबर कॅम्पमधील राजर्षी शाहू विद्यालय ही खूप जुनी शाळा होती. या शाळेत हिंदी, मराठी, उर्दू तसेच दक्षिणेकडील काही भाषा या शाळेत शिकवल्या जात होत्या. ही शाळा म्हणजे विभागातील सामान्य गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची एक चांगली सोय होती. चार वर्षांपूर्वी पालिकेकडून धोकादायक इमारत व नूतनीकरणाच्या नावाखाली ही इमारत पाडण्यात आली. आजतागायत पालिकेने येथे इमारत उभारली नाही. शाळेच्या जागी मोकळे मैदान आहे. माटुंग्यात पालिकेची एकमेव मोठी व सर्व भाषिक शाळा असल्याने हजारो विद्यार्थी या शाळेत शिकत होते. या विद्यार्थ्यांसमोर पर्यायी शिक्षण कोठे घ्यायचे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सध्या या मुलांसाठी सहा खोल्यांची खुराडीवजा शाळा आहे; पण तिथे विभागातील सर्व मुलांना शिक्षण घेणे शक्‍य होत नसल्याने इतर विभागाकडे शिक्षणासाठी धाव घ्यावी लागत आहे. चार वर्षे पूर्ण झाली, तरी शाळेच्या इमारतीच्या कामाच्या शुभारंभाचा नारळ फुटत नाही.

विभागातील समाजसेवक जॉन सांगळे यांनी माहिती अधिकारातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय शाळा पाडून चार वर्षे झाली असून अतिक्रमण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

Web Title: rajshree shahu vidyalaya