'ई-लिलाव' पद्धतीने आता रेशीम विक्री

सिद्धेश्‍वर डुकरे
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

ठाणे, पालघरसह राज्यात मोहीम

ठाणे, पालघरसह राज्यात मोहीम
मुंबई - ठाणे, पालघर, पश्‍चिम महाराष्ट्रासह राज्यातील शेतकऱ्यांना राज्यातील रेशीम उद्योगाला चालना देण्याकरिता सहकार विभागाने कंबर कसली आहे. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करताना या पुढे रेशीम विक्री "ई-लिलाव' पद्धतीने केली जाणार आहे. हे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

रेशीम उत्पादनासाठी सहकार विभागाने मोहीम सुरू केले आहे. यात शेतकऱ्यांना रेशीम शेतीविषयी माहिती, प्रोत्साहन, अंडी, कोष, किडे, अनुदान देण्यात येते. एका विशेष मोहिमेत महिन्यात सुमारे पाच हजार शेतकऱ्यांनी रेशमाची शेती करण्याकरता सहभाग दर्शवला. राज्यात रेशीम उत्पादन उत्तम होते. यात तुती आणि टसरपासूनचे रेशीमही आहे. राज्यात उत्पादन होणाऱ्या रेशीमकोषची खरेदी-विक्री मात्र कर्नाटकात होते. त्यामुळे स्थानिक बाजारपेठ देण्याकरता सहकार विभाग प्रयत्नशील आहे.

जालना बनणार "रेशीम हब'
राज्यातील रेशीम सध्या कर्नाटकात विक्रीसाठी पाठवले जाते. यावर उपाय म्हणून जालना जिल्हा रेशीम हब म्हणून सरकारने घोषित केला आहे. जालन्यात यापुढे रेशीम खरेदी-विक्रीसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.

सहकार विभागाचे उद्दिष्ट
- 25 हजार शेतकरी रेशमी उत्पादक बनवणार
- 15 हजार हेक्‍टर क्षेत्रावर रेशीमची शेती
- वार्षिक उलाढालीचे लक्ष्य ः 800 कोटी