करंटे लोक पालिकेवर टीका करतात - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

मुंबई - मुंबई महापालिका नागरिकांना आरोग्य सेवेपासून शिक्षणापर्यंत सर्व सुविधा पुरवते. त्याचे कौतुक करण्याऐवजी काही करंटे लोक महापालिकेच्या कारभारावर टीका करतात, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता. 19) भाजपला लगावला.

दादर येथील अग्निशमन दलाच्या नव्या इमारतीचे उद्‌घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी पालिकेच्या कामाचे तसेच अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक केले. मुंबई महापालिका देशातील सर्वोत्तम महापालिका असून, ती नागरिकांनाही सर्वोत्तम सुविधा पुरवते. प्रचंड ओझे पेलूनही पालिका काम करत आहे. अन्य महापालिका या ओझ्याखाली दबून मेली असती. तरीही काही करंटे लोक महापालिकेचे काम विचित्र पद्धतीने सुरू असल्याची टीका करतात. हा त्यांचा आंधळेपणा आहे, असे ते म्हणाले.

पालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप काही दिवसांपासून शिवसेनेला लक्ष्य करत आहे. आतापर्यंत शिवसेनेचे पदाधिकारी या आरोपांना उत्तर देत होते. बुधवारी उद्धव यांनी प्रथमच भाजपला प्रत्युत्तर दिले.

भाजपचा बहिष्कार
पालिकेच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर भाजप पदाधिकाऱ्यांची नावे असतात; मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर भाजपच्या एकाही पदाधिकाऱ्याचे नाव नव्हते. त्यामुळे उपमहापौरांसह भाजपचा एकही प्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित नव्हता.