प्रचारफेऱ्यांत नियमांचे उल्लंघन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

नियम मोडणाऱ्या कार्यकर्त्यांकडे  उघड्या डोळ्यांनी पाहत बसण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली आहे...

ठाणे - ठाणे पालिका निवडणुकीच्या प्रचाराचा उत्साह शिगेला पोहोचला आहे; मात्र काही अतिउत्साही कार्यकर्ते प्रचार करतेवेळी विनाहेल्मेट, ट्रिपल सीट बसून वेगाने गाड्या चालवून वाहतूक नियम सर्रासपणे मोडत असल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी दिसत आहे. नियम मोडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या या मनमानीकडे केवळ उघड्या डोळ्यांनी पाहत बसण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली आहे. या अतिउत्साही कार्यकर्त्यांच्या गोंधळाचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. मात्र याकडे राजकीय मंडळीनीही डोळेझाक केली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी इतका उन्माद करणारे निवडून आल्यावर कसे वागतील, असा प्रश्न ठाण्यातील मतदार विचारत आहेत. 

निवडणुकीच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मोटरसायकल रॅली काढण्यावर विशेष भर दिला जातो; मात्र या रॅलीवेळी मतदारांना मतांचे दान करण्याची विनंती करण्याऐवजी केवळ शक्तिप्रदर्शनच केले जात आहे. या शक्तिप्रदर्शनावेळी अनेक दुचाकीस्वार विनाहेल्मेट वाहने चालवत आहे. शिवाय एका गाडीवर तीन-तीन जण बसून वाहतूक नियमांना हरताळ फासतात. उमेदवारांच्या डोळ्यादेखत हे प्रकार होतात. विशेष म्हणजे त्यावर कुणीही आक्षेप घेत नाही. ठाण्यात निघणाऱ्या सगळ्याच पक्षांच्या रॅलीत हे प्रतीकात्मक चित्र असून वाहतूक पोलिसही हतबल झाले आहेत.

रस्त्याने चालणाऱ्या सामान्य नागरिकाला त्रास होईल, अशा स्वरूपाच्या रॅलींना परवानगी नाकारण्याचे धैर्य वाहतूक पोलिस का दाखवत नाहीत, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत. कायदा तोडणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यावर पोलिसांनी कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतल्यास ही परिस्थिती बदलू शकेल. वाहतूक पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी थेट कारवाई करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण त्यामुळे त्यांचे धैर्य वाढून गुन्हे करण्यासही ते पुढाकार घेतात. नाकेबंदीवर एखाद-दुसऱ्या मोटरसायकलस्वारावर कारवाई करण्याबरोबरच अशी झुंड करून येणाऱ्यांवरही कारवाईची गरज आहे.
- योगेश मोकाशी, ठाणे

Web Title: rules violation in campaign