चंद्रात साई दिसल्याच्या अफवेने दर्शनासाठी झुंबड

चंद्रात साई दिसल्याच्या अफवेने दर्शनासाठी झुंबड

ठाणे - भाद्रपद पौर्णिमेच्या चंद्रावर शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा सोमवारी रात्री समाजमाध्यमांवर पसरली. त्यामुळे कल्याण आणि डोंबिवलीपासून ठाणे-मुंबई शहरांतील मैदाने अन्‌ रस्त्यांवर चंद्रदर्शनासाठी झुंबड उडाली. थोड्याच वेळात चंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा दिसत असल्याचा संदेश आल्यानंतर ती अफवा असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घरची वाट धरली. 

दरम्यान, नागरिकांनी कोणतीही घटना वैज्ञानिक पातळीवर तपासून पाहिली पाहिजे. कोणत्याही संदेशाची शहानिशा न करता तो पसरवून अफवेला खतपाणी घालू नये, असे आवाहन खगोलतज्ज्ञांनी केले आहे.

सोमवारी चंद्राचा एक फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. पौर्णिमेच्या चंद्रावर साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा रात्री शहरभर पसरली. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून किंवा मोकळ्या जागेत नागरिक चंद्रदर्शनासाठी जमले. काही नागरिक साईबाबा दिसत असल्याचे सांगत हात जोडून दर्शनही घेत होते. यापूर्वीही कर्नाटक राज्यात अशीच अफवा पसरली होती. तेव्हाही तेथील नागरिकांनी चंद्र पाहण्यासाठी गर्दी केली होती. मध्यंतरी शिर्डीत एका भिंतीवर साईबाबा दिसतात, अशी अफवा पसरली होती; परंतु सर्वांचा वैज्ञानिकदृष्ट्या विचार आपल्या पातळीवर प्रत्येकाने केला पाहिजे. आधुनिक युगात प्रत्येकाने सारासार विचार केला पाहिजे, असे मत खगोलतज्ज्ञांनी व्यक्त केले.

चंद्रामध्ये कोणाची प्रतिमा दिसते, ही अफवा आहे. मोबाईलमुळे या गोष्टी झपाट्याने पसरतात आणि यावर काही नागरिक त्वरित विश्‍वास ठेवतात; परंतु प्रत्येक गोष्टीचा वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला गेला पाहिजे. चंद्रावर वातावरण नसल्याने आकाशमालेतील पाषाण चंद्रावर आदळत असतात. त्यामुळे चंद्रावर विवर तयार होतात. या विवरांमध्ये प्रकाश न पडल्याने तो भाग आपल्याला अंधारलेला दिसतो आणि मनात जशी प्रतिमा चिंतू तशी प्रतिमा आपल्याला पौर्णिमेला पूर्ण चंद्राचे दर्शन होते तेव्हा दिसते; परंतु हे सर्व गैरसमज असून अशा अफवांवर विश्‍वास ठेवू नये.
- दा. कृ. सोमण, खगोलतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com