हिमालयाएवढ्या कर्तृत्वावर ‘सकाळ सन्मान’ची मोहोर!

दिमाखदार वर्धापनदिन सोहळ्यात असामान्य समाजदूतांचा गौरव
sakal sanman sohala 2022 Awards to social worker mumbai
sakal sanman sohala 2022 Awards to social worker mumbaisakal media

मुंबई : कोरोना काळात सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून, आपला जीव धोक्यात घालून समाजासाठी झटणाऱ्या निष्काम कर्मयोग्यांच्या पाठीवर थाप देऊन त्यांना प्रोत्साहन देणारा आणि इतरांनाही असे हिमालयाएवढे काम करण्यास उद्युक्त करणारा ‘सकाळ सन्मान २०२२’चा दिमाखदार सोहळा शुक्रवारी (ता. २५) जुहूतील मुकेश पटेल ऑडिटोरियममध्ये पार पडला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मांदियाळीच्या साक्षीने २४ सत्कारमूर्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आपल्या कर्तृत्वाने आणि सेवाभावी वृत्तीने सामान्यांतील असामान्य ठरलेल्या शिलेदारांचा सन्मान करताना उपस्थित सर्वांचाच ऊर भरून आला होता.

संकटकाळात गरजूंसाठी देवदूत ठरलेल्या ‘सोशल स्टार्स’चा ‘सकाळ’ने आपल्या ५१ व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात यथोचित सन्मान केला. ‘कनेक्टिंग डॉट्‌स’ संकल्पनेअंतर्गत सेवाभावी संस्था आणि व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी खास वेळ काढून या सोहळ्याच्या उत्तरार्धात सहभागी झाले आणि दिलखुलास मुलाखतीने हा सोहळा यादगार केला. तत्पूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अभिनय, राजकारण, समाजकारण आदी क्षेत्रांमधील मान्यवरांनी सोहळ्यातील सन्मानार्थींची मुक्तकंठाने प्रशंसा केली. गडकरी, फडणवीस आणि चव्हाण यांच्याबरोबरच चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या हस्ते सेवाव्रतींना पुरस्कार देण्यात आले. आमदार पराग अळवणी, श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अध्यक्ष व एनएमआयएमएसचे कुलपती अमरीश पटेल, श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे उपाध्यक्ष भूपेशभाई पटेल, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर, ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक-संचालक श्रीराम पवार, ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव आदी सोहळ्याला हजर होते.

समाज प्रबोधनविषयक चित्रपटांची निर्मिती करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, आमदार महेश लांडगे, विविध समाजसेवी संस्थांचे संचालक राज देशमुख, पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. मंदार नाडकर्णी, ‘सिडको’चे सहनिबंधक डॉ. केदारी जाधव, ‘एमईपी’चे व्यवस्थापकीय संचालक जयंत म्हैसकर, आवाज फाऊंडेशनच्या संयोजक सुमैरा अब्दुलअली, ‘वडार महाराष्ट्राचा संघटने’चे संस्थापक विजय चौगुले, ‘लेट्स रिडस्’चे संस्थापक प्रफुल्ल वानखेडे, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन, स्वयंसेवी रुग्णवाहिका सेवेचे प्रमुख राघव नरसाळे, इन्सानियत संस्थेचे प्रमुख अर्जुन दत्ता मेघे, आश्रय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, नवउद्योजक राहुल हजारे, संकल्प सेवाभावी संस्थेचे कुणाल राऊत, जनरेशन एसकेपी संस्थेच्या प्रमुख ईशा बर्थवाल, आहन वाहन मोहिमेच्या सूत्रधार प्रिया शर्मा आणि पुकार संस्थेच्या प्रमुख चैत्रा यादवर (संयुक्त पुरस्कार) अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील सेवाव्रतींचा समावेश पुरस्कारविजेत्यांमध्ये आहे. सर्व समाजसेवकांच्या कार्याचा परिचय करून देणाऱ्या विशेषांकाचे प्रकाशनही गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

‘‘बातमीबरोबरच सामाजिक भान जपण्याचा वसा ‘सकाळ’ने कायम जपला आहे. त्या व्रतानुसारच आजचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सकाळ’ने तज्ज्ञांच्या साह्याने केलेले प्रयत्न, महिलांसाठी तनिष्का, तरुणांना राजकारणाचे व्यावसायिक प्रशिक्षण देणारे ‘यिन’ व्यासपीठ आदी समाजोपयोगी उपक्रमांचा परिणाम राज्यात काही वर्षांनंतर नक्कीच दिसेल,’’ असा विश्‍वास ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य संपादक राहुल गडपाले यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला.

तारांकित सादरीकरणाने चार चाँद!

आपल्या कर्तृत्वाने वास्तवातील ‘सोशल स्टार’ ठरलेल्या सेवाव्रतींचा गौरव करण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकारांची मांदियाळीच लोटली होती. छोट्या पडद्यावरील तरुण उमदे कलाकारही सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आले होते. अभिनेत्री अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत, संस्कृती बालगुडे, मानसी नाईक, अभिनेता पुष्कर जोग, सिद्धार्थ खिरीद आदी कलाकारांचा नृत्याविष्कार आणि ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार’च्या छोट्या उस्तादांनी सादर केलेली गाणी सोहळ्याचे आकर्षण ठरली. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या काही गीतांवरील नृत्य सादरीकरणाने त्यांना मानवंदना देण्यात आली. लावणीच्या फ्युजनवरील दिलखेचक अदांना तरुणांनी टाळ्या-शिट्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.

खऱ्या समाजसेवेचा वस्तुपाठ!

मंचावर मनोरंजनापेक्षाही सामाजिक जाणिवेला महत्त्व दिल्याचे सतत जाणवत होते. सामाजिक मंचावरून सेवाव्रतींचा गौरव हाच कार्यक्रमाचा गाभा होता. त्यालाच अनुसरून खरी समाजसेवा म्हणजे काय, याचे यथार्थ वर्णन हलक्याफुलक्या किश्श्यांच्या साह्याने सूत्रसंचालक मृण्मयी देशपांडे आणि अमेय वाघ यांनी केले. खुमासदार सूत्रसंचालन करत त्यांनी सोशल मीडियाच्या मायाजाळात गुंतून न पडता खऱ्या समाजसेवेचा वसा अंगीकारणे किती आवश्यक आहे, याचा वस्तुपाठच घालून दिला.

मान्यवरांची कौतुकाची थाप

पुरस्कार सोहळा आयोजित करून असामान्य कर्तृत्व करणाऱ्या समाजसेवकांचा गौरव करणाऱ्या ‘सकाळ’च्या सामाजिक बांधिलकीचे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांनी कौतुक केले. केवळ याच पुरस्कारावर समाधान मानून थांबण्याऐवजी यातून प्रेरणा घेऊन आणखी समाजसेवा करावी, हा फडणवीस यांचा सल्लाही सगळ्यांनाच भावला. रात्री उशिरा समारंभासाठी आलेल्या गडकरी यांच्याशी ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य संपादक राहुल गडपाले यांनी संवाद साधला. गडकरी यांनी राजकारणाच्या पलीकडे जात शरीरस्वास्थ्य, स्वयंपाककला, मुंबईच्या खाऊगल्ल्या, हॉटेल आणि विकासकामांबाबतचे व्हीजन अशा विविध मुद्द्यांबाबत दिलखुलास गप्पा मारल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com