भंगार रिक्षा धावताहेत मुंबईच्या रस्त्यांवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

भंगारात निघालेल्या रिक्षा 

  • वडाळा 2,738 
  • अंधेरी 2,620 

(* सन 2016 मधील आकडेवारी)

मुंबई : कल्याणमध्ये बेकायदा रिक्षा भंगारात काढण्याची कारवाई परिवहन खात्याने सुरू केली असली तरी मुंबईतील कालबाह्य रिक्षांकडे अद्याप लक्ष गेलेले नाही.

रिक्षाचालकांनीच पुढाकार घेतल्याने उपनगरांतील अंधेरी व वडाळा आरटीओने वर्षभरात पाच हजारांच्या आसपास रिक्षा भंगारात काढल्या. उपनगरांत एक लाखाहून अधिक रिक्षा असून भंगारात निघालेल्या रिक्षांची संख्या तुलनेने कमी आहे. 

मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या नियमांनुसार रिक्षाचे आयुर्मान 16 वर्षे निश्‍चित करण्यात आले आहे. परिवहन खाते रिक्षा भंगारात काढते; पण त्यासाठी चालकांचा पुढाकार अपेक्षित असतो. चालकाला नवीन रिक्षा घेण्यासाठी आरटीओकडे कागदपत्रे द्यावी लागतात. जुनी रिक्षा भंगारात काढण्यासाठी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली जाते.

आठवड्यातील ठराविक दिवशी भंगारात निघालेल्या रिक्षांवर बुलडोझर चालवला जातो. त्यामुळे त्या वापरण्याजोग्या राहत नाहीत. कल्याण व भिवंडीतील अशा रिक्षांवर परिवहन खात्याने बुलडोझर चालवला; पण मुंबईतील पूर्व व पश्‍चिम उपनगरांतील काही भागांत कालबाह्य झालेल्या रिक्षाही धावत असतात. विशेषत: पूर्व उपनगरांत गोवंडी, कुर्ला परिसरात जुनाट रिक्षा रात्री सर्रास वापरल्या जातात. नवीन रिक्षा खरेदी करणारा चालक जुनी रिक्षा देतो; पण नियमाला बगल देत तीच रिक्षा पुन्हा रस्त्यावर दिसते. 

भंगारात निघालेल्या रिक्षा 

  • वडाळा 2,738 
  • अंधेरी 2,620 

(* सन 2016 मधील आकडेवारी)

Web Title: Scrapped rickshaws on Mumbai roads Mumbai RTO Mumbai Traffic