केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राची वाताहत ; शरद पवार यांची टीका

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 एप्रिल 2018

केंद्र सरकारचा देशातील सहकार विभागाविषयीचा दृष्टिकोन चांगला नाही. अडचणीत असलेल्या सहकारी बँकांना मदत करण्याऐवजी बलाढ्य राष्ट्रीय बँकांना सरकार मदत करीत आहे. केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राची वाताहत झाली असल्याची टीका माजी कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केली.

मुंबई : केंद्र सरकारचा देशातील सहकार विभागाविषयीचा दृष्टिकोन चांगला नाही. अडचणीत असलेल्या सहकारी बँकांना मदत करण्याऐवजी बलाढ्य राष्ट्रीय बँकांना सरकार मदत करीत आहे. केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणांमुळे सहकार क्षेत्राची वाताहत झाली असल्याची टीका माजी कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे केली. मुंबईत डेक्कन मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचा शतकपूर्ती सोहळा मुंबईत आयोजित केला होता, त्यावेळी पवार बोलत होते. 

पवार म्हणाले, की ज्यावेळी रुग्णाला औषध हवे आहे, त्यावेळेत ते दिले जात नाही. उलट रुग्णावर जादा बंधने घालून त्यास आणखी कमकुवत केले जाते. हेच धोरण या सरकारचे आहे. त्याचा फटका सहकार क्षेत्रास बसत आहे. बॅंकेच्या स्थापनेवेळेस 21 हजार सभासद होते, आज ते दुपटीपेक्षा जास्त झाले, हा विश्‍वास या सहकार बॅंकेवर दाखवला जातो. आता दिवस थोडे वेगळे आले आहेत. सहकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होताना दिसतो आहे. चारपाच लोकांची चूक होते, त्याची किंमत संपूर्ण लोकांना भोगावी लागते. अशा परिस्थितीत सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मी वारंवार हे काम केले, असे त्यांनी सांगितले. 

अडसूळ यांची सरकारवर नाराजी 

या कार्यक्रमात अडचणीत आलेल्या सिटी बॅंकेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी केंद्र सरकारच्या सहकारी धोरणावर नाराजी व्यक्त केली. सहकारी बॅंकांबाबत सहकार्याचे धोरण राबवू असे अर्थमंत्री अरुण जेटली म्हणतात, पण प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही. आम्ही सत्तेत असून सत्तेत नसल्यासारखे वाटते. आता आम्ही निवडणूक विरोधात लढवायचे ठरविले आहे असे अडसूळ म्हणाले. 

Web Title: Sharad Pawar Criticizes Co operative Sector