अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक मुंबईत उभारणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

शेगाव - साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे जागतिक दर्जाचे स्मारक चेंबूर (चिरागनगर) मुंबई येथे उभारणार असून, त्याचा कृती आराखडा लवकरच सरकारला सादर करणार आहे, अशी माहिती साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे सदस्य सचिव व मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते मधुकर कांबळे यांनी सोमवारी दिली.

शेगाव येथे समाज बांधवाच्या वतीने केलेल्या सत्काराला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. अण्णा भाऊ साठे यांचे मुंबई येथे स्मारक व्हावे, अशी मागणी मातंग समाजाकडून होत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबई येथे स्मारक समितीची घोषणा केली असून, मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते मधुकर कांबळे यांची सदस्य सचिवपदी निवड केली. त्यानंतर ते प्रथमच शेगावात आले होते.

या वेळी कांबळे म्हणाले, स्मारक जागतिक दर्जाचे व्हावे, याकरिता कार्यकर्त्यांच्या संकल्पना विचारात घेऊन त्या ठिकाणी चार एकर जागेवर अण्णा भाऊंचा भव्य पुतळा, सभागृह, जागतिक दर्जाचे ग्रंथालय, मातंग समाजातील विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा केंद्र, कलाकार प्रशिक्षण केंद्र आदी सुविधा असतील. त्या ठिकाणी असलेल्या काही कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.