'बोललेले विसरणारी आमची जातकुळी नाही'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

मुंबई - जे बोलतो ते करून दाखवतो, अशी टॅगलाइन घेत जाहीरनामा प्रसिद्ध करताना सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला पुन्हा लक्ष्य केले. निवडणुकीनंतर बोललेले विसरून जायचे, ही आमची जातकुळी नाही. 114 जागा मागून भाजपने कुचेष्टा केली, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला.

दादर येथील "शिवसेना भवन'मध्ये सोमवारी ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा वचननामा प्रकाशित करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपच्या घोषणांची खिल्ली उडवली. वचननाम्यात शिवसेनेने भरगच्च घोषणा केल्या आहेत. ही वचनपूर्ती करण्यासाठी किती पैसे लागतील, असे विचारले असता "अच्छे दिन आणण्यासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे नक्कीच लागणार नाहीत' असे ते म्हणाले. "माफियागिरी'च्या आरोपाचाही त्यांनी समाचार घेतला. माफियागिरीचे आरोप करणारेच पक्षात माफिया घेऊन फिरत आहेत, असा प्रतिहल्ला त्यांनी भाजपवर चढवला. मुंबईबरोबरच सर्व महानगरांत रस्त्यांवर खड्डे असतात. पुण्यातही खड्डे आहेत. नागपूर महापालिकेत भयाण परिस्थिती आहे, असेही ते म्हणाले. शिवसेनेने भाजपपुढे 60 जागांचा प्रस्ताव मांडून चेष्टा केली, अशी भावना भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यावर 114 जागा मागून भाजपने कुचेष्टा केली, असा चिमटा त्यांनी काढला.

Web Title: Shiv Sena chief Uddhav Thackeray