विस्ताराबाबत शिवसेनेत अस्वस्थता

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 5 जुलै 2016

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्या कामात मी व्यग्र आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. आम्हाला काय पाहिजे काय नाही, हा प्रश्नच नाही. जे काही मिळेल ते सन्मानाने मिळाले पाहिजे. लाचार होऊन आम्ही कोणाकडे जाणार नाही. 
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख 

मुंबई - केंद्राबरोबरच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला स्थान मिळणार की नाही याबाबतची अनिश्‍चितता कायम असल्याने शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी शिवसेना सत्तेत सहभागी असूनही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत त्यांना डावलले जात असल्यानेच "लाचार होऊन कोणाजवळ जाणार नसल्याची‘ तिरस्कार व्यक्‍त करणारी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या पार्श्‍वभूमीवर दिली आहे. केंद्रात एक कॅबिनेट किंवा स्वतंत्र कार्यभाराचे मंत्रिपद मिळवण्याचे शिवसेनेचे मनसुबे अपूर्ण राहण्याचे स्पष्ट होऊ लागल्यानेही शिवसेनेतली अस्वस्थता यानिमित्ताने उघड होऊ लागली आहे. 

मंत्रिमंडळात शिवसेनेच्या मंत्र्यांच्या सहभागाविषयी कोणतीच चिन्हे आज दिसली नाहीत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी देखील याविषयी प्रतिक्रिया व्यक्‍त करताना, "केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत आमच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही, त्यामुळे आम्ही लाचार होऊन कोणाजवळ जाणार नसल्याचे,‘ म्हटले आहे. 

केंद्रात एक कॅबिनेट किंवा स्वतंत्र कारभार मिळावा अशी शिवसेनेची अपेक्षा आहे. राज्य मंत्रिमंडळातही शिल्लक कोट्यापैकी एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद शिवसेनेने मागितले आहे. मात्र, शिवसेनेला अधिक जवळ न करता त्यांच्याबाबत थोडे कडक धोरण अवलंबण्याचा निर्धार भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेची अधिकाधिक कोंडी करण्याचे धोरण भाजप यापुढे अवलंबणार असल्याने राज्य मंत्रिमंडळात शिवसेनेला "न्याय‘ मिळण्याची शक्‍यता कमी असल्याचे समजते.