'विकास आराखडा मंजुरीच्या शिवसेनेच्या हालचालींना वेग' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

मुंबई - विकास आराखडा मंजूर करण्याची लगबग सुरू झाली असून त्याचे सादरीकरण शुक्रवारी महापौर बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर झाले. या आराखड्याला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी दिली. 

मुंबई - विकास आराखडा मंजूर करण्याची लगबग सुरू झाली असून त्याचे सादरीकरण शुक्रवारी महापौर बंगल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर झाले. या आराखड्याला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी दिली. 

पालिका निवडणुकीच्या आचारसंहितेत मुंबईचा विकास आराखडा अडकला होता. निवडणुकीनंतर या आराखड्याच्या मंजुरीला वेग देण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत आहे. शुक्रवारी महापौर बंगल्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. या वेळी महापौर महाडेश्‍वर, शिवसेनेचे नेते अनिल परब, पालिकेचे आयुक्त अजोय मेहता, नगररचनातज्ज्ञ चंद्रशेखर प्रभू, पालिकेचे सभागृह नेते यशवंत जाधव, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश कोरगावकर, सुधार समितीचे अध्यक्ष बाळा नर उपस्थित होते. 

मुंबईच्या विकास आराखड्यासाठी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली असून हा आराखडा 19 मेपूर्वी मंजूर केला जाईल. त्यानंतर तो नगरविकास खात्याकडे पाठवला जाईल, अशी माहिती महापौर महाडेश्‍वर यांनी दिली. 

गुरुवारी नगरसेवकांना माहिती 
सर्व पक्षांच्या नगरसेवकांना शिवसेना 13 एप्रिलला नायर रुग्णालयातील सभागृहात आराखड्याविषयी सविस्तर माहिती देणार आहे. आपल्या विभागात कुठे आणि कसे आरक्षण पडले आहे, तसेच आराखड्यातील तांत्रिक बाबी कशा समजावून घ्याव्यात, याविषयी या वेळी माहिती दिली जाईल, अशी माहिती महापौर महाडेश्‍वर यांनी दिली. यातून काही समजले नसेल, तर पालिका मुख्यालयात सहाव्या मजल्यावरील संबंधित विभागात नगरसेवकांच्या शंकांचे निरसन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.