डोंबिवलीत युवासेनेच्या पदाधिऱ्यांचा 'राडा'; फेरीवाल्यांचे सामान फेकले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

डोंबिवली स्थानकाच्या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 'या समस्येवर ठोस कारवाई करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे', अशी टीका करत युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांचे सामान रस्त्यावर फेकून दिले.

डोंबिवली : ठाणे महानगरपालिकेचे प्रशासन अनधिकृत फेरीवाऱ्यांवर बेधडक कारवाई करत असताना 'कल्याण-डोंबिवली मनपाच्या आयुक्तांना आपण पाहिले का?' असा प्रश्‍न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उपस्थित केला होता. त्यानंतर यावर पुढचे पाऊल टाकत युवासेना आणि शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज (सोमवार) सायंकाळी अचानक डोंबिवली पूर्वेकडील परिसरात 'कारवाई' केली.

या पदाधिकाऱ्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हुसकावून लावले आणि त्यांचे सामनही रस्त्यावर फेकले. 'पालिका अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांवर कडक कारवाई केली नाही, तर त्यांच्या चेहऱ्याला काळे फासू', असा इशाराही त्यांनी दिला. 

डोंबिवली स्थानकाच्या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 'या समस्येवर ठोस कारवाई करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे', अशी टीका करत युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांचे सामान रस्त्यावर फेकून दिले. 

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे फेरीवाल्यांची पळापळ झाली. नेहमीप्रमाणे 'कारवाई' करणारे पालिकेचे 'फेरीवाला हटाव' पथक आज स्टेशन परिसरात दिसले नाही. परंतु फेरीवाल्यांचे सामान जप्त करण्यासाठी उभी असलेली पालिकेची गाडी रिकामीच दिसली. यावर 'गाडी रिकामी का?' असा जाबही युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाहनचालकाला विचारला.