शिक्षण विभाग अधिकाऱ्यांच्या परीक्षेला शिवसेनेचा आक्षेप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

मुंबई - महापालिका शिक्षण विभागातील बीट अधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकारी पदावर बढती देण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांना परीक्षा सक्तीची केली आहे. हे परिपत्रक तातडीने रद्द करून अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसारच बढती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने पालिका सभागृहात केली. 

पालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी पदासाठी रिक्त जागा भरण्यासाठी बीट अधिकाऱ्यांना सेवाज्येष्ठतेनुसार बढती न देता परीक्षा घ्याव्यात, असे परिपत्रकात म्हटले आहे. शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी शिक्षण समिती, पालिका सभागृहाला अंधारात ठेवून हे परिपत्रक काढले. शिक्षण अधिकाऱ्यांनी यापूर्वीही असे निर्णय मनमानी पद्धतीने घेतले आहेत. बीट अधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकारी पदावर बढती देण्यासाठी परीक्षा घेणे चुकीचे ठरेल. अनेकांचे वय ५० ते ५४ दरम्यान असल्याने त्यांना सेवाज्येष्ठतेनुसारच बढती मिळणे आवश्‍यक आहे. परीक्षेचा निर्णय रद्द करण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली.

मनसेची टीका
पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बढतीचा मुद्दा सभागृहाऐवजी शिक्षण समितीच्या बैठकीत चर्चेला आणण्याची गरज होती. शिक्षण समिती अध्यक्षांना ते जमले नाही. यातून शिवसेनेचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही, अशी टीका मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी शिवसेनेवर केली. यावर शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर यांनी आमचा प्रशासनावर वचक आहे असे सांगितले.