काँग्रेसमध्ये स्मशानशांतता 

दीपक शेलार - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

काँग्रेसला हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेसुद्धा यश मिळणे दुर्लभ मानले जात आहे...

ठाणे -  काँग्रेसमुक्त देशाची वल्गना करणाऱ्या भाजपचे भाकीत ठाण्यात मात्र खरे ठरण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीच्या तोंडावर अनेक दिग्गजांनी काँग्रेसला ‘हात’ दाखवून शिवसेना-भाजपमध्ये उड्या मारल्याने ठाण्यात काँग्रेससाठी लढाई अस्तित्वासाठी आहे. राष्ट्रवादीसोबत वरकरणी आघाडी झाली असली, तरी कमी महत्त्वाच्या जागा पदरात पडल्याने काँग्रेसला हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेसुद्धा यश मिळणे दुर्लभ मानले जात आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली असताना काँग्रेसच्या गोटात स्मशानशांतता असल्याने उमेदवार धास्तावले आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीची २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आघाडी झाली होती. त्या वेळी १३० पैकी काँग्रेसच्या वाट्याला ५९ जागा आल्या होत्या; मात्र या वेळी १३१ पैकी ५८ जागांवर बोळवण करून मित्रपक्ष राष्ट्रवादीने काँग्रेसचे खच्चीकरण केले. त्यात विद्यमान काँग्रेस नेत्यांमुळे पाच जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले. दोघांचे अर्ज अपूर्ण; तर तिघांना पक्षाचे एबी फॉर्म वेळेवर पोहोचू न शकल्याने फक्त ५३ जण रिंगणात आहेत. मुंब्रा भागात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांवर राष्ट्रवादीनेसुद्धा उमेदवार उभे केल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयाचा मार्ग खडतर बनला आहे.

पालिकेच्या मागील सभागृहात काँग्रेसचे १८ नगरसेवक निवडून आले होते; मात्र काही महिन्यात त्यातील बहुतांश नगरसेवकांनी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची वाट धरली. त्यामुळे या खेपेला काँग्रेसला उमेदवार मिळवताना नाकीनऊ आले. मुंब्य्राची एखादी जागा काँग्रेसला मिळण्याची आशा असून शहर अध्यक्ष मनोज शिंदे, शैलेश शिंदे आणि परमार आत्महत्या प्रकरणात तुरुंगाची वारी करून आलेले विक्रांत चव्हाण आदींना निवडून येण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागणार आहेत. उर्वरित सर्वच उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचवताना दमछाक होणार आहे. कारण, काँग्रेस श्रेष्ठींकडून निवडणुकीची रसद तर पुरवली; मात्र उमेदवारांच्या पराभूत मानसिकतेमुळे मतदानाआधी प्रचारातच ठाण्यात काँग्रेस हरल्याचे चित्र दिसत आहे.
 
१५ नगरसेवकांचे आऊटगोईंग 
ठाणे जिल्ह्यात आजघडीला काँग्रेसचा एकही आमदार, खासदार नाही. काँग्रेसमध्ये पहिली फूट त्या वेळचे राणेसमर्थक रवींद्र फाटक यांनी पाडली. त्यांच्यासोबत सात नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. त्यानंतर गटनेते संजय घाडीगावकर भाजपच्या वळचणीला; तर त्यांच्या जागी आलेले गटनेते राजन किणे आणि नगरसेविका रेश्‍मा पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंब्य्राच्या साजीया अन्सारी राष्ट्रवादीत, मालती पाटील शिवसेनेत; तर मेघना हंडोरे, जयनाथ पूर्णेकर, नारायण पवार यांनी कमळ हाती घेत भाजपची उमेदवारी पटकावली. सीताराम राणे, भरत पडवळ, शैलेश सावंत आदींनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अन्य पक्षाचा आश्रय घेतला.

Web Title: silence in Congress